मारहाणीत झाला होता मृत्यू; तब्बल २३ महिन्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल
By प्रदीप भाकरे | Published: December 10, 2022 12:27 PM2022-12-10T12:27:29+5:302022-12-10T12:31:18+5:30
सखोल चौकशी : न्यायालयीन अहवाल व पीएम रिपोर्टवरून गुन्ह्याची नोंद
अमरावती : एका व्यक्तीच्या मारहाणीअंती झालेल्या मृत्युप्रकरणी तब्बल २३ महिन्यांनी एका व्यापाऱ्यांसह दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरीगेट पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी रात्री शैलेश मदनराव राठी (रा. सक्करसाथ) याच्यासह दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून राठी याला अटक देखील केली. अब्दुल कलिम अब्दुल समद असे मृत तरुणाचे नाव आहे.
तक्रारीनुसार, नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ट्रान्सपोर्ट गल्ली परिसरात एका ट्रकमधून कापड बॉक्स चोरीच्या प्रयत्नात असलेल्या अब्दुल कलिम याला मारहाण करण्यात आली होती. १६ जानेवारी २०२१ रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजता ट्रान्सपोर्ट गल्लीत उभ्या ट्रकमधून कापडाचे बॉक्स चोरी करताना अब्दुल कलिम हा शैलेश राठी व अन्य दोन ते तीन जणांना दिसला होता. त्यामुळे राठी व अन्य काहींनी त्याला मारहाण केली व नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी राठीच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी अ. कलिमविरुद्ध चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, पोलिसांनी वैद्यकीय तपासणी अंती त्याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याच दिवशी न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले होते. त्यामुळे पोलिसांनी अ. कलिमला कारागृहात दाखल केले होते. त्याच दिवशी रात्री ८.३० सुमारास अ. कलिम हा कारागृहात चक्कर येऊन पडला त्यामुळे त्याला उपचारासाठी इर्विनला दाखल केले होते. उपचारादरम्यान १८ जानेवारी २०२१ ला दुपारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर १९ जानेवारीला शवविच्छेदन करण्यात आले होते.
हा न्याय बंदी असल्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू झाली होती. शवविच्छेदन अहवाल व न्यायालयीन चौकशी आदेशावरून फ्रेजरपुराचे पीएसआय गजानन राजमल्लू यांनी नागपुरी गेट ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शैलेश राठी व अन्य दोन ते तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अनेक जखमांमुळे मृत्यू
उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर अ. कलिम याचे शवविच्छेदन करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या शरीरावर तब्बल २८ बाह्य जखमा आढळल्या होत्या. त्याच्या मृत्युचे कारण हा ‘शॉक ड्यु टू मल्टिपल इंजुरिज, अननॅचरल’असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे त्याचा मृत्यू राठी व त्याच्या सोबत असलेल्यांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा निष्कर्ष चौकशीत समोर आला. त्यानुसार, गुन्ह्याची नोंद करण्यात आली.