‘ती’ हत्या अनैतिक संबंधातून; महिलाही आरोपी, गुंता सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 10:44 AM2023-03-06T10:44:18+5:302023-03-06T10:46:42+5:30

आकस्मिक मृत्यूचा तपास : नागपुरी गेट पोलिसांनी लावला छडा

man was murdered over from an immoral relationship; two accused arrested, amravati | ‘ती’ हत्या अनैतिक संबंधातून; महिलाही आरोपी, गुंता सुटला

‘ती’ हत्या अनैतिक संबंधातून; महिलाही आरोपी, गुंता सुटला

googlenewsNext

अमरावती : दोन दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी महिला व पुरुष अशा दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दि. ४ मार्च रोजी रात्री ११.२३ च्या सुमारास गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक करण्यात आली.

रमजान खान रहमान खान (५४, इरफाननगर, लालखडी) असे मृताचे नाव आहे. २ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास रमजान खान यांचा मृतदेह आरोपीच्या घराशेजारी बिस्मिल्लानगर येथे रक्तबंबाळ स्थितीत दिसून आला होता. त्याप्रकरणी, मृताचा मुलगा मोहीन खान (२४) याच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान तो खून असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली व ४८ तासांच्या खुनाचा छडा लावत आरोपींना जेरबंद करण्यात ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांची ‘टीम नागपुरी गेट’ला यश आले. आरोपी नसीरोद्दीन नईमोद्दीन (५५, बिसमिल्लानगर) व एका महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मेश्राम यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन सूक्ष्म तपास चालविला होता.

असा लागला छडा

रमजान खान हा भंगार खरेदी-विक्रीचे काम करीत होता. रमजान खान हा आरोपी नसीरोद्दीन नईमोद्दीन याला मजुरीकरिता न्यायचा. त्यामुळे त्याचे आरोपीच्या घरी येणे-जाणे होते. अशातच एका महिलेशी रमजान खानचे सूत जुळले. त्यांच्यात अनैतिक संबंधदेखील प्रस्थापित झाले. दि. १ मार्च रोजी रात्री १० नंतर रमजान खान हा नसीरोद्दीन नईमोद्दीनच्या घरी गेला. तेथे त्यांच्यात कडाक्याचा वाद झाला. त्यादरम्यान नसीरोद्दीन नईमोद्दीनने एका महिलेशी संगनमत करून रमजान खान याच्या कपाळावर, उजव्या कानाच्या बाजूला हत्याराने वार केले तथा त्याला जिवानिशी ठार करून शेजारच्या पडक्या घरात टाकून दिले.

आकस्मिक मृत्यूचा तपास करतेवेळी संशयावरून एकाला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली. याप्रकरणी त्याच्यासह एका महिलेविरुद्धदेखील खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीच्या घरी रक्ताचे डाग आढळले होते.

- पुूंडलिक मेश्राम, ठाणेदार, नागपुरी गेट

Web Title: man was murdered over from an immoral relationship; two accused arrested, amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.