अन् तब्बल आठ वर्षांनंतर 'त्याची' कुटुंबाशी झाली भेट; बहादूर माजी सैनिक संघटनेची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:46 PM2023-01-30T16:46:50+5:302023-01-30T16:54:24+5:30
स्मृतिभ्रंश झाल्याने राहत होता गोव्याच्या निवारागृहात
अमरावती : तो कुटुंबासाठी आणखी पैसे कमावण्यासाठी गोव्यात गेला. मात्र, अपघातात स्मृती गमावून बसला. बहादूर माजी सैनिक संघटनांच्या पुढाकाराने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या इसमाला आठ वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबात परत आणण्यात आले.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाई बोथ येथील सोमनाथ चंपतराव माळोदे (५६) यांचा हा प्रवास आहे. ते पत्नी, चार मुली व मुलगा यांच्यासह राहत होते. कुटुंबाची आर्थिक स्थिती बरी नसल्याने ते आणखी पैसे गाठीशी ठेवण्यासाठी गोव्याला काम पाहण्यास गेले. २०१५ मध्ये त्यांना तेथे अपघात झाला आणि स्मृती गमावून बसले. गोव्यातील डॉक्टर जॅक्सन यांनी त्यांना रस्त्याच्या कडेवरून उचलून त्यांच्यावर उपचार केले. डोक्याची व पोटाची शस्त्रक्रिया केली आणि त्यांना मरणाच्या दारातून बाहेर काढले. त्यांनी गोव्यातील मदर तेरेसा मिशनरी ऑफ चॅरिटी गोवा येथे सोमनाथ यांची व्यवस्था केली. संस्थेने रवी हे टोपण नाव दिले.
दरम्यान, आठ वर्षांमध्ये सोमनाथ हे घरी न परतल्याने माळोदे कुटुंबाने ते दगावल्याची समजूत करून घेतली. पत्नी रंजना यांनी चारपैकी तीन मुलींचे लग्न लावून दिले. २०२३ मध्ये बहादूर माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी.एस. राय यांचे अकोला येथील नातेवाईक सुरेश घन व त्यांच्या पत्नी गोव्याला गेल्या होत्या. तेथे मदर तेरेसा मिशनरीजमध्ये त्यांना ‘रवी’ भेटले. त्यांनी बडनेरा, वाई असे संबोधन केले. त्यामुळे घन दाम्पत्याने त्याचा व्हिडीओ घेऊन राय यांना सांगितले. राय यांनी नांदगाव खंडेश्वर ठाणेदारांशी व ठाणेदारांनी पोलिस पाटलांशी संपर्क केला.
व्हिडिओवरून पटली ओळख...
पोलिस पाटलांनी व्हिडीओ व फोटो दाखवताच रंजना यांनी पती सोमनाथची ओळख पटविली. यानंतर घन दाम्पत्य व राय हे गोव्याला गेले. तेथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमनाथ यांचे ग्रामस्थांशी बोलणे करून दिले. यानंतर सोमनाथ यांची पत्नी व दोन्ही जावई यांनी गोवा गाठले व कागदोपत्री सोपस्कार आटोपून सोमनाथ मालोदे आपल्या गावी परतले. यासाठी बी.एस. राय यांना माजी सैनिक व संघटनेचे पदाधिकारी प्रदीप गायकवाड, नंदकिशोर काळे, गजानन सुरेकर आदींचे सहकार्य लाभले.