निवडणूक मानधनावरून ‘मानापमान’
By admin | Published: April 26, 2017 12:16 AM2017-04-26T00:16:01+5:302017-04-26T00:16:01+5:30
महापालिकेच्या निवडणूक माधनावरुन दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जुंपली असून मानापमान नाट्य रंगले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील लाथाडी : भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अमरावती : महापालिकेच्या निवडणूक माधनावरुन दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जुंपली असून मानापमान नाट्य रंगले आहे. यानिमित्ताने प्रशासनामध्येही रंगलेली वर्चस्वाची लढाई अधोरेखित झाली आहे.
‘मला देत नसाल तर त्यांनाही देऊ नका’ असा पवित्रा अतिरिक्त आयुक्तांनी घेतल्याने प्रशासनाची मात्र कोंडी झाली आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे आणि उपायुक्त प्रशासन विनायक औगड यांच्यामधील विळ्या भोपळ्याचे सख्य महापालिकेतच नव्हे, तर मंत्रालयातही सर्वश्रृत आहे. त्यामुळे या वर्चस्वाच्या लढाईला ‘सिनियर - ज्युनिअर’ची किनारही लाभली आहे.
२१ फेब्रुवारीला अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यात महापालिकेसह विविध आस्थापनेवरील अधिकारी - कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. त्यासाठी त्यांना मानधनही देण्यात आले. याच मालिकेत अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांचे निवडणूक काळातील मानधनाची फाईल निवडणूक विभागाकडून उपायुक्त (प्रशा)कडे पाठविण्यात आली. मात्र सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये अतिरिक्त आयुक्तांचा निवडणुकीच्या कामात कोणताही सहभाग नाही, अशी माझी धारणा आहे, अशी प्रशासकीय टिप्पनी उपायुक्त विनायक औगड यांनी केली. त्यामुळे लेखा विभागाने शेटे यांचे मानधन रोखले ही बाब माहिती पडताच १३ एप्रिलला एक टिपणी लिहून शेटे यांनी ती आयुक्तांपुढे पाठविली. आयुक्तांच्या स्वाक्षरीने निवडणूक कालावधीत आपल्यावर ‘इव्हीएम’ची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती. ती आपण पूर्णपणे पार पाडली. याशिवाय आपण सातही झोनला प्रत्यक्षात भेटी दिल्या. त्यामुळे औगड यांची धारणा चुकीची असल्याचे शेटे यांनी आयुक्तांना कळविले. त्यावर आयुक्तांनी तपासून सादर करण्याचे निर्देश दिलेत.
औगड यांनी वैयक्तिक द्वेषातून आपल्याला निवडणुकीचे मानधन अदा करू नये म्हणून जाणीवपूर्वक धारणा व्यक्त केल्याचा आरोप अतिरिक्त आयुक्तांनी केला आहे. इव्हीएमची जबाबदारी सोपविण्यात आल्यासंदर्भात आयुक्तांनी काढलेला आदेशही शेटे यांनी या पत्राला जोडला आहे. (प्रतिनिधी)
औगडांचा सहभाग काय ?
उपायुक्त विनायक औगड यांच्या टिप्पणीने शेटे यांचे निवडणूक मानधन अदा करण्यात आले नाही. त्या पार्श्वभूमीवर औगड यांनी नोडल आॅफिसर म्हणून निवडणुकीसंदर्भात कोणतीही प्रत्यक्ष कर्तव्ये पार पाडली नाहीत. निवडणूक कामात कोणताही प्रत्यक्ष सहभाग नसतानासुद्धा त्यांना मानधन अदा केल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.
-तर त्यांनाही देऊ नये मानधन
आपण इव्हीएमचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याबाबत मानधन अदा करावे, अथवा विनायक औगड यांचे मानधन परत घ्यावे, अशी विनंती शेटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. माझे मानधन देत नसाल तर त्यांचेही देवू नका, अशी भूमिका शेटे यांनी घेतल्याने औगड आणि अतिरिक्त आयुक्तांमधील सख्य अधोरेखित झाले आहे.