मिझोरमच्या जंगलात आढळला ‘मॅन्डारीन रॅट स्नेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:02 PM2019-06-12T13:02:52+5:302019-06-12T13:08:52+5:30
मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात मॅन्डारीन रॅट स्नेक या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मिझोरमच्या दुर्गम व मनुष्यविरहित जंगलात मॅन्डारीन रॅट स्नेक या सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात अमरावती येथील वन्यजीव संशोधक अशहर खान यांच्या चमूने यश मिळविले. ते हिमालय, पश्चिम घाट, ईशान्य व मध्य भारतातील सरिसृपांवर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय तथा राज्य वनविभागाच्या मदतीने संशोधन करीत आहेत.
भारतातील चार जैवविविधता ज्वलंत प्रदेशांपैकी एक म्हणजे इंडो-बर्मीज पर्वत शृंखला होय. या मिझोरम, नागालंड आणि त्रिपुरा राज्यांत पसरल्या आहेत. येथील एकूण क्षेत्रफळाच्या सत्तावन टक्के भूप्रदेश वनच्छादित असून, अजूनही या भागातील बहुतांश जंगले ही दुर्गम आणि मनुष्यविरहित आहे. याच प्रदेशातून वैज्ञानिकांच्या एका चमूस सापाची नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. गतवर्षी इंडो-म्यानमार सरिसृप सर्वेक्षणादरम्यान मुरलेन राष्ट्रीय उद्यान ते चामफाई महामार्गावर खान व त्यांच्या सहकारी संशोधकांना दुर्मीळ साप मृतावस्थेत आढळला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि मिजोरम वनविभागाकडून परवाना असल्याने सर्प-शवास मिजोरम विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र संग्राहलयात ठेवण्यात आले. प्रजातीसंदर्भात अतिरिक्त माहिती इंडियन हर्पेटोलॉजिकल सोसायटी (पुणे), भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग (कोलकाता) आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने गोळा करण्यात आली तसेच तायवान आणि चीनमध्ये आढळणाऱ्या इतर नमुन्यांशी पडताळणी करून संशोधनपत्र लिहिले गेले. हस्तलिखिताच्या प्रती शहानिशाकरिता व्ही. दीपक (लंडन) आणि गरनॉट वोगल (जर्मनी) यांना पाठविण्यात आल्या. सदर संशोधन हे अमेरिकेच्या नामांकित ‘अॅम्फिबियन रेप्टाइल कन्झर्व्हेशन’ या संशोधनपत्रिकेने नुकतेच प्रकाशित झाले आहे.
सापाचे शास्त्रीय नाव 'युप्रेपायोफीस मॅन्डारिनस' असून, इंग्रजीत याला 'मॅन्डारीन रॅट स्नेक' असे म्हणतात. युप्रेपायोफीस कुळातील भारतात आढळणारी ही एकमेव जात असून, मिझोरम वगळता ती फक्त नागालंड आणि अरुणाचल प्रदेशात सापडल्याची माहिती खान यांनी दिली. या संशोधनात खान यांना आय.एफ.एस. जेनी सायलो, एच.टी. लालरेमसंघा (मिझोरम विद्यापीठ), व्ही. रंगास्वामी (भारतीय वन सर्वेक्षण विभाग) आणि टॉम चार्ल्टोन (ईको अॅनिमल एन्काउन्टर, लंडन) यांची मदत लाभली.
मॅन्डारीन रॅट स्नेकची शरिररचना
मॅन्डारीन रॅट स्नेकच्या शरीरावर अत्यंत सुंदर अशा राखाडी-लाल खवल्यांवर जाड काळी वलये पसरली असून, ही वलये पिवळ्या गर्द खवल्यांनी भरलेली असतात. डोके लांब, निमुळते आणि भडक पिवळे-काळे असते. मॅन्डारीन रॅट स्नेक हा उत्क्रांतीच्या हातमागावर निसर्गाने विणलेला अत्यंत सुबक, नक्षीदार असा नमुना आहे. निसर्गातील इतर जीव भडक रंगाच्या जिवांपासून दूर राहतात. तथापि, ही जात अत्यंत मवाळ आणि पूर्णत: विषहीन आहे.
अशहर खान यांची चांदूर बाजारशी नाळ
अशहर खान यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार तालुक्यातील नगर परिषद व जी.आर. काबरा विद्यालयात झाले. पुढे त्यांनी वनविद्याशास्त्रात पदवी संपादन करून वन्यजीवशास्त्रात पदव्युत्तर केले. त्यांनी अभ्यास व संशोधन सातत्याने सुरूच ठेवले. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील यश गाठले. सध्या ते ओडिशातील उभयचरांवर अभ्यास करीत असून, भारतातील शेकडो सरिसृपप्रेमींना वैधानिक मदत करीत आहेत.