आंबियाची ५४ हजार हेक्टरमध्ये गळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:52 AM2018-01-12T00:52:09+5:302018-01-12T00:52:22+5:30
यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामात बऱ्यापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची रसशोषक किडींचा प्रादुभार्व, बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलामुळे फळगळ झाली. यामध्ये उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ५३ हजार ३९२ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ३३ टक्क्यांवर नुकसान असलेल्या ३८ हजार १४१.७७ हेक्टरमध्ये नैसर्गिक आपत्तीची मदत मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात साधारणत: संत्र्याचा आंबिया बहर घेतला जातो. परंतु, यावर्षी आॅगस्ट महिन्यात वातावरण बदलासह किडीमुळे संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. याविषयी शेतकऱ्यांच्या सातत्याने तक्रारी झाल्यात, शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकºयांना मदत व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ७ डिसेंबरला संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतकºयांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल शासनाला सादर झाला. या बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीची प्रतीक्षा आहे.
यंदा आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वातावरणात दिवसा उष्णतामान अधिक होते. वातावरणातील बदलासह अन्नधान्याची कमतरता व बुरसीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानेही आंबियाची प्रचंड फळगळ झाली. बोटिओडीप्लोडीया, किलीटोट्रिकम व काही प्रमाणात आॅल्टर नेरिया या बुरसीमुळेही संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. या बुरशी देठाद्वारे फळात प्रवेश करून नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो. काळी माशी, मावा तुडतुडे, यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशीची वाढ होते व पेशीक्षय होऊन फळगळ झाली. संत्र्यांमध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत असलेल्या बुरसीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. मात्र, याची लक्षणे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दिसून आलीत. या बुरशीचा प्रादुर्भाव संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर होऊन तेथे काळपट व तपकिरी रंगाचे डाग पडलेत व तो भाग कुजून फळांची गळती झाली.
रसशोषक किडीमुळेही फळगळ
संत्र्याची फळे पक्वहोण्याच्या काळात रसशोषक किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. हे पंतग संध्याकाळच्या वेळी अर्धकच्ची फळात छिद्र करून रस शोषण करतात. या छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन फळे पिवळी पडतात व छिद्रातून रोगजंतूचा शिरकाव होऊन याच छिद्रापासून फळे सडण्यास सुरूवात होते. परिणामी कीडग्रस्त फळे गळून पडतात. मृगबहराच्या तुलनेत आंबिया बहाराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत या किडीचा जास्त प्रादुर्भाव दिसून आला.