आंब्याची झाडे करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:47 PM2017-12-19T22:47:18+5:302017-12-19T22:48:23+5:30
नजीकच्या शहापूर येथे महावितरण कंपनीच्या वाहिनीच्या जिवंत तारांत घर्षण झाल्याने आगीचे लोळ पडून आंब्याची दोनशे लहान झाडे करपली,....
आॅनलाईन लोकमत
चिखलदरा : नजीकच्या शहापूर येथे महावितरण कंपनीच्या वाहिनीच्या जिवंत तारांत घर्षण झाल्याने आगीचे लोळ पडून आंब्याची दोनशे लहान झाडे करपली, तर दीड लाख रुपयांचे गवत जळाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.
तालुक्यातील शहापूर येथील माजी सरपंच हिरुजी हेकडे यांनी त्यांच्या शेतात गुरांच्या चाऱ्यासाठी गवत वाढविले आहे. तेथेच दोनशे आंब्याची झाडे लावली आहेत. त्यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहिनीत घर्षण होऊन आगीचे लोळ गवतावर पडले. गवताला लागलेली आग पसरत गेली व यात दोनशे आंब्याची लहान झाडे करपली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रदीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
तारांमध्ये घर्षण होत असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे याची दुरूस्ती करावी, अशी विनंती नागरिकांनी केली होती. मात्र, त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यासोबतच बेजबाबदारीने उत्तर देत उद्धट वागणूक दिल्याचा आरोप पीडित शेतकरी हेकडे यांनी केला आहे. या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनादेखील पुन्हा तसाच अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.
मोठा अनर्थ टळला
मंगळवारी हेकडे यांच्या शेतात खांबावरून आगीचे गोळे पडल्याने गुरांसाठी पेरलेल्या गवताने पेट घेत पाच एकर शेत कवेत घेतले परिसरात हवेचा वेग अधिक असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. शेत गावशिवारावर असल्याने आग पसरत गावाच्या दिशेने येत होती गांवकऱ्यांना सदर प्रकार दिसताच त्यांनी विरुद्ध दिशेने गवतावर पाणी ओतले परिणामी आग विझली.
पाच एकर शेतातील गुरांसाठी असलेला चारा पूर्णत: जळून राख झाला. त्याची झळ दोनशे आंब्याच्या झाडाला बसून मोठे नुकसान झाले विद्युत वितरणाच्या अधिकाºयांनी सतत दुर्लक्ष केले, त्यांच्यावर कारवाही व्हावी.
- हिरुजी हेकडे, शेतकरी शहापूर