मंगरूळ चव्हाळाच्या शिक्षकाचा ग्रीन प्रोजेक्ट सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:19+5:302021-05-21T04:14:19+5:30
संजय जेवडे फोटो पी २० गावंडे नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अंकुश ...
संजय जेवडे
फोटो पी २० गावंडे
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील मंगरूळ चवाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अंकुश गावंडे यांनी वर्ल्ड वाइड ग्रीन प्रोजेक्ट नावाचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी सन २०२० ते २०२५ या कालावधीत जगभरात १० लाख वृक्षारोपण व वृक्षसंवर्धंनाचे ध्येय ठेवले आहे.
गावंडे हे उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक असून, ते चार ते पाच वर्षांपासून विविध देशांतील शिक्षक व विद्यार्थ्यांशी आपल्या विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हा प्रकल्प जगातील विविध देशांतील शिक्षकांना पटवून दिला व या प्रकल्पात सहभागी करून घेतले. सध्या हा प्रकल्प ३५ विविध देशांत पोहोचला आहे. त्यांनी या प्रकल्पांतर्गत ३५ देशांत प्रत्येकी एक शिक्षक समन्वयक म्हणून नेमले आहे. हा प्रकल्प मायक्रोसॉफ्ट फ्लिपग्रिड, स्काईप, वेकेलेट, गूगल फॉर्म याद्वारे चालतो. एवढेच नाही तर त्यांनी या प्रकल्पाची वेबसाइट व मोबाइल ॲपसुद्धा बनविले आहे. ज्याद्वारे विविध देशांतील शिक्षक या प्रकल्पात जुळतात व आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतात.
या प्रकल्पात प्रत्येक विद्यार्थ्यांना सहा आठवड्यांचा कार्यक्रम पूर्ण करावा लागतो. पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे आभासी सत्र घेतले जाते. त्यांना वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व पर्यावरण प्रदूषणमुक्त वातावरण याचे महत्त्व पटवून दिले जाते. ऑग्मेंटेड रियालिटी या तंत्रज्ञानाद्वारे मनोरंजक पद्धतीने पाठ घेतला जातो. सहा आठवडे पूर्ण केल्यानंतर आभासी सत्राद्वारे सहभागी शिक्षकांना वर्ल्ड वाइड ग्रीन प्रोजेक्ट कॅप्टन व सहभागी विद्यार्थ्यांना वर्ल्ड वाइड ग्रीन प्रोजेक्ट सोल्जर, असे सन्मानपूर्वक आंतरराष्ट्रीय प्रकल्प प्रमाणपत्र दिले जाते.
५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी होऊ शकतात सहभागी
यामध्ये भारत, रोमानिया, मलेशिया, रशिया, नेपाळ, इराक, इटली, युएई, तुर्की, स्पेन, पॅलेस्टाईन, ग्रीस, युक्रेन, जॉर्जिया, व्हिएतनाम, बांग्लादेश, अल्बेनिया, ट्युनिशिया, पाकिस्तान, मोरोक्को, इजिप्त, केनिया, लिबिया, जॉर्डन, अझरबैजान, इंडोनेशिया, तांजानीया, मसेडॉनीया, फिलीपींस, मेक्सिको, ताइवान, अर्मेनिया, मॉन्टेंनेग्रो, थायलंड, इथियोपिया हे देश समाविष्ट असून याव्यतिरिक्त, इतर अनेक देशांतील शिक्षक सहभागी होत आहेत, असे अंकुश गावंडे यांनी सांगितले. हा शून्य बजेट प्रकल्प असून या प्रकल्पाची नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. या प्रकल्पात भारतातील ११ राज्यातील शिक्षक जुळले आहेत. यात महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्याचा समावेश असल्याचे ते म्हणाले.