भाविकांची मांदियाळी

By admin | Published: October 2, 2016 12:07 AM2016-10-02T00:07:30+5:302016-10-02T00:07:30+5:30

विदर्भाची कुलस्वामिनी व अंबानगरीची ग्रामदेवता असलेली अंबामाता - एकवीरा मातेची पूर्जा-अर्चना व विधीवत श्रृंगार करून...

Manguiyal of the devotees | भाविकांची मांदियाळी

भाविकांची मांदियाळी

Next

अंबा-एकवीरा देवीची घटस्थापना : शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
अमरावती : विदर्भाची कुलस्वामिनी व अंबानगरीची ग्रामदेवता असलेली अंबामाता - एकवीरा मातेची पूर्जा-अर्चना व विधीवत श्रृंगार करून शनिवारी उत्सवात घटस्थापना करण्यात आली. शनिवारी पहिल्याच दिवशी अंदाजे दीड लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. श्री अंबादेवी संस्थानचे सचिव डी.एम. श्रीमाळी यांनी सपत्नीक अंबा मातेची सकाळी ८.३० वाजता विधीवत घटस्थापना केली. यावेळी देवीची महापूजा श्री सुक्त देवीला अभिषेक करण्यात आला. नंतर देवीला साजश्रृंगार, पातळ घालून, दागिन्यांचा साज चढविण्यात आला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी श्री अंबादेवी संस्थानचे अध्यक्ष सु. कृ पाठक, उपाध्यक्ष विद्या देशपांडे, कोषाध्यक्ष अतुल आळशी आदी उपस्थित होते. पूजेकरिता ११ पुजारी उपस्थित होते.
एकवीरा मातेची विधीवत घटस्थापना
सकाळी ९ वाजता एकवीरा मातेची घटस्थापना करण्यात आली. यावर्षी घटस्थापनेचा व पूजेचा मान चंद्रशेखर कुलकर्णी यांना मिळाला. त्यांनी सपत्नीक देवीची विधीवत पूजा केली. देवीला अभिषेक करण्यात आला. यानंतर श्रृंगार व महाआरती करण्यात आली. रोज पाहटे ४ वाजता हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. रात्री २ वाजताची आरती करून २.३० वाजता हे मंदिर बंद केले जाते. यावेळी जनार्धन स्वामींचाही अभिषेक करण्यात आला. १०.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष आर. एल. गोडबोले यांच्या हस्ते ध्जारोहण करण्यात आले. उपाध्यक्ष चंद्रशेखर भोंदू, सचिव शैलेश वानखडे, कोषाध्यक्ष टेंभे, व्यवस्थापक शरद अग्रवाल आदी उपस्थित होते. अशी माहिती माजी व्यवस्थापक तथा विश्वस्त मधुकर सराफ यांनी दिली. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक दर्शनाकरिता आल्यामुळे परिसरात अलोट गर्दी उसळली होती. देविला खण नारळाची ओटी व पातळ अनेक भाविकांनी वाहले. पूजेसाठी १४ पुजारी उपस्थित आहेत. (प्रतिनिधी)

अंबादेवी स्वयंभू, १३ व्या शतकापूर्वीची नोंद
श्री अंबादेवीची मूर्ती ही स्वयंभू वाळूकामय असून पद्मासनस्थित बसलेली आहे. देवीचे मंदिर फार प्राचीन आहे. या जुन्या मंदिरावर नवीन मंदिर उभारले आहे. या मंदिराला फार मोठा इतिहास असून रुक्मिणी हरणाचीही अख्यायिका आहे. भीष्मक यांची कन्या रुक्मिणी हिचे हरण भगवान श्रीकृष्णाने उमरावतीच्या अंबेच्या मंदिरातून केल्याची पूर्वइतिहासात नोंदणी आहे. श्री अंबा देवीच्या मंदिराचा उल्लेख १८७० च्या 'गॅझेटीअर दि हैदाबाद असाईन डिस्ट्रिक्ट्स' या पुस्तकात केलेला असून हे भवानीचे मंदिर एक ते दीड हजार वर्षांपूर्वीच बांधलेले असावेत, असा उल्लेखदेखील इतिहासात आढळतो. इ.स. १९९१ व १९६८ मध्ये उमरावती जिल्ह्याचे गॅझेटीअर प्रसिद्ध झाले. त्यातदेखील असा उल्लेख करण्यात आलेला आहे. सेटलमेंट रेकॉर्डमध्येही हे मंदिर हजार ते दीड हजार वर्षांपूर्वीचे असल्याची नोंद आहे. श्री गोविंद प्रभूंच्या दौऱ्याच्या उल्लेखातही आलेला आहे. तेराव्या शतकात ते उमरावतीत आले असता हे रुक्मिणी हरणाचे स्थान पाहिले, अशी नोंद आहे. तसेच जागृत दैवत अंबाबाई या पुस्तकातही तसा उल्लेख करण्यात आला आहे.

श्री एकवीरा देवी संस्थानच्यावतीने विविध कार्यक्रम
नवरात्र उत्सवा दरम्यान श्री एकवीरा देवी संस्थानच्या वतीनेही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ४ ते ६.३० वाजता भाविक भक्तांची श्रीस अभिषेक षोडषोपचार पूजा व श्रृंगार आरती करण्यात येते. शनिवारी घटस्थापना व ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले. नऊ दिवस विविध भजनी मंडळाच्यावतीने भजन, प्रवचन व किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. रोज सायंकाळी ७ वाजता, विष्णुसहस्त्रनाम तथा मंत्र जागर करण्यात येणार आहे. रोज रात्री १२.३० ते २ वाजेपर्यंत महाआरती व प्रसाद वाटप करण्यात येते. ९ आॅक्टोबरला रविवारी दुपारी कुमारिकांचे पूजन करण्यात येईल. १० आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता हवनाला सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम. दशमीला श्रींची पालखी व सीमोल्लंघनास निघेल. या कार्यक्रमासाठी रोज लाखो भाविकांची गर्दी असते. १ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजता हभप वासुदेव बुवा बुरसे पुणे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम. १० आॅक्टोबरला सोमावरी रात्री ८ वाजता हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे वारकरी कीर्तन होणार आहे.

Web Title: Manguiyal of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.