मंजिरी अलोनेचा विजयी जल्लोष, पावसात न्हाले नांदगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:10+5:302021-08-20T04:17:10+5:30
पान ३ लीड नांदगाव खंडेश्वर : जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत दोन पदकांची कमाई करून परतलेल्या मंजिरी अलोनेची नांदगावात बुधवारी ...
पान ३ लीड
नांदगाव खंडेश्वर : जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत दोन पदकांची कमाई करून परतलेल्या मंजिरी अलोनेची नांदगावात बुधवारी गावातून विजयी रॅली काढण्यात आली. भर पावसात निघालेल्या रॅलीला येथील आबालवृद्धांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पोलंड येथे जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत नांदगावच्या एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीची विद्यार्थिनी मंजिरी मनोज अलोने हिने १५ व १६ ऑगस्टला झालेल्या वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही लढतीत ब्राँझ पदक पटकाविले. तिचे बुधवारी दुपारी ४ वाजता येथे आगमन होताच विजयी रॅली काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशाच्या गजरात ही रॅली आनंदोत्सव साजरा करीत जात असताना मार्गात ठिकठिकाणी तिचे औक्षण करण्यात आले. या रॅलीदरम्यान पावसाने हजेरी लावली. नांदगावचा पाऊसही मंजिरीच्या विजयी जल्लोषात आनंदाने न्हाला.
रॅलीचा समारोप एकलव्य धनुर्विद्या अकादमीत करण्यात आला. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंजिरी अलोने व तिचे प्रशिक्षक अमर जाधव यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड हे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकादमीचे मार्गदर्शक सदानंद जाधव यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन विलास मारोटकर यांनी केले. कार्यक्रमासाठी विशाल ढवळे, राजेंद्र लवंगे, अनूप काकडे, पवन जाधव, उमेश परसनकर, उत्तमराव मुरादे, महेंद्र मेटकर, संदीप डोफे व इतर मंडळींचे योगदान लाभले. यावेळी विविध राजकीय पक्षांची मंडळी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.
190821\1453-img-20210819-wa0008.jpg
नांदगावात मंजिरी अलोणे व प्रशिक्षक अमर जाधव यांच्या सत्काराचा जल्लोष.