एमआयडीसीत चक्क बनावट देशी दारू निर्मिती; कारखानाच टाकला!
By प्रदीप भाकरे | Published: August 9, 2024 05:05 PM2024-08-09T17:05:48+5:302024-08-09T17:06:07+5:30
गुन्हे शाखा युनिट एकने टाकली धाड : लिंक तपासणार, सबकुछ बनावट.
अमरावती: गेल्या तीन महिन्यांपासून स्थानिक एमआयडीसीत चक्क बनावट देशी दारू निर्मिती करणारा कारखानाच सुरू होता. ‘सबकुछ बनावट’ अशा धर्तीवरील त्या कारखान्यावर गुरूवारी उशिरा रात्री धाड टाकून गुन्हे शाखा युनिट एकने तो गोरखधंदा उघड केला. तेथून १०.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसीतील बंद कारखाना भाडेतत्वावर घेऊन तेथे एका नामांकिम देशी दारू ब्रॅंडची कॉपी करून बनावट दारू निर्मिती व विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शुक्रवारी दिली.
गुन्हे शाखा युनिट एकचे पथक ८ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास रोजी पेट्रोलिंग करीत एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. ई २६ या ठिकाणी असलेल्या फॅक्टरीमध्ये काही जण अवैधरित्या बनावटी देशी दारूची निर्मिती करीत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव यांच्या टिमने तेथे धाड टाकली. तेथील बॉटलिंग व पॅकिंग युनिट पाहून पथक देखील अवाक झाले. तेथून हर्षवर्धन रमेश सपकाळ (४२, मोतीनगर बगीच्याजवळ), सागर सुरेश तिवारी (४३, गणपती नगर) व योगेश विकास प्रधान (२४, किरण नगर) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना देशी दारू बॉबी संत्रा आणि देशी दारू टॅंगो पंच या कंपनीच्या देशी दारूच्या नकली मालाची निर्मिती करताना रंगेहात पकडले गेले. याप्रकरणी तिनही आरोपींविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ कंपनीप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या साहित्याचा वापर
आरोपींनी कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात निर्मित होणाऱ्या देशी दारू ‘बॉबी संत्रा’ व टॅंगो पंच या मुळ कंपनीप्रमाणेच हुबेहुब देशी दारूच्या नकली मालाची निर्मिती सुरू केली होती. त्यासाठी आवश्यक असलेले अल्कोहोल, ऑरेंज फ्लेवर, आर ओ प्लांट, बॉटल फिलिंग मशीन, कंपिंग मशिन, प्रिंटींग साहित्य, बॉक्स, रिकाम्या बॉटल, स्टॅम्प, प्रिंटेड सेलो टेपच्या माध्यमातून नकली बनावटी संजीवणी देशी दारू या ब्रॅंडची निर्मिती चालविली होती. कोल्हे साखर कारखाना त्या दारूची निर्मिती व पॅकिंगसाठी जे साहित्य वापरते, त्याची देखील येथे आरोपींनी हुबेहुब नकल चालविली होती. बॉटलची झाकणे, स्टिकर देखील बनावट तयार करण्यात आले.
हा मुद्देमाल जप्त
तीनही आरोपी ही नकली दारू जिल्हयातील अवैधरीत्या किरकोळ विक्रेत्यांना विकत होते. आरोपींकडून कार, नकली देशी दारूने भरलेल्या ३४०० बॉटल, फार्माग्रेड अल्कोहोलने भरलेल्या २१ कॅन, गोल्डन ऑरेंज फ्लेवरच्या सात कॅन, दारू निर्मितीकरीता वापरलेल्या वेगवेगळ्या मशिनरी, प्रिटिंग साहित्य असा एकुण १० लाख ९० हजार २४८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सीपी नविनचंद्र रेड्डी, डीसीपी कल्पना बारवकर व गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम पीआय गोरखनाथ जाधव, एपीआय मनिष वाकोडे, योगेश इंगळे व अनिकेत कासार यांच्या टिमने ही कारवाई केली.