साडेपाच कोटींच्या इमारतीमध्ये अनेक त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:05 AM2021-08-02T04:05:29+5:302021-08-02T04:05:29+5:30
पथ्रोट : साडेपाच कोटी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या येथील सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची ...
पथ्रोट : साडेपाच कोटी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या येथील सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने पूर्णत: तयार असली तरी त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने हस्तांतरणाला अडचण निर्माण झाली आहे.
मदर पीएचसी म्हणून ओळख असणाऱ्या या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात उपकेंद्रांचा समावेश असून, ८५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याचा भार जुन्या इमारतीमधून सांभाळला जात होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना रुग्णांची सेवा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत व निवासस्थाने व्हावी, अशी मागणी होती. या मागणीची दखल घेत साडेपाच कोटी रुपयांचा निधी खर्च करून याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात आली.
सद्यस्थितीला दोन्ही इमारती पूर्ण झाली असल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात येत असले तरी आरोग्याच्या इमारतीमध्ये गप्पी मासे साठवण टाकी नाही. स्वच्छालयला खिडक्या नाहीत. प्रसूती साहित्य-औषध नष्ट करण्यासाठी खड्डा नाही. रुग्णवाहिकेसाठी शेड नाही. संरक्षण भिंतीला फेन्सिंग नाही. आरोग्य केंद्राची इमारत व निवासस्थानाच्या मध्ये भिंत नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये फर्निचर नाही. आवाराच्या परिसरात पक्के रस्ते नाहीत. ४८ हजार रुपयांच्या थकीत बिलामुळे विजेची व पाण्याची जोडणी नाही. शवविच्छेदनगृहाचे नूतनीकरण नाही. अशा मुख्य कारणामुळे हस्तांतरण कसे करून घेणार, हा प्रश्न आरोग्य विभागाकडून निर्माण झाल्याने नवीन इमारत धूळखात उभी आहे.
---------------
एका छोट्याशा असुविधा असलेल्या खोलीतून रुग्णसेवा सुरू आहे. मुख्य सुविधा पूर्ण होईपर्यंत हस्तांतरण करून घेणे शक्य होणार नाही.
- चंद्रशेखर आरके, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, पथ्रोट
------------
अंदाजपत्रकानुसार आरोग्य केंद्राच्या इमारतीचे व निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहेत.
- महेश गाडगे, कंत्राटदार
अंतर्गत फर्निचर व इतर सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाकडे ७० लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. ती मिळताच राहिलेली कामे पूर्ण करण्यात येतील.
- राजेश कापले, उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग