अपक्ष आमदारांचा भूंकप दिसेल, भाजप उमेदवार निवडून येईल; आमदार रवी राणांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 03:53 PM2022-06-04T15:53:56+5:302022-06-04T15:55:41+5:30
राज्यसभा निवडणुकीसाठी अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याची ग्वाही
अमरावती : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार कायम असल्याने १० जून रोजी निवडणूक अटळ आहे. मात्र, या निवडणुकीत अपक्ष आमदारांच्या माध्यमातून मतदानाच्या वेळेस मोठा भूकंप दिसेल आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक हे विजयी होतील, असा दावा बडनेऱ्याचे अपक्ष आमदाररवी राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
अपक्ष आमदारांना महाविकास आघाडी अडीच वर्षे न्याय देऊ शकली नाही, असा टोलाही आमदार राणांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. येथील शासकीय विश्रामभवनात आपदग्रस्तांना नुकसानाचे धनादेश आमदार रवी राणा यांच्या हस्ते शनिवारी वितरीत करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांची बाजू घेताना मोठा दावा केला. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे पूर्ण केले असले तरी अपक्ष आमदारांचा केवळ वापर केला, असा आरोपही आमदार राणा यांनी केला.
अपक्ष आमदारांच्या मनात महाविकास आघाडी सरकारबद्दल खदखद असून, ही खदखद १० जून रोजी मतदानातून स्पष्ट होईल. अपक्ष आमदारांना दुय्यम वागणूक, विकास कामांसाठी निधी नाही, मतदार संघात अनेक प्रकल्प रखडले असताना ते पूर्ण केले जात नाही, अपक्ष आमदारांची सातत्याने अडवणूक होत असल्याने ते राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळेस मोठा भूकंप दिसेल आणि भाजपचा उमेदवार निवडून येईल, असा दावाही त्यांनी केला.
एवढेच नव्हे तर अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य असल्याची ग्वाही आमदार राणा यांनी दिली. ज्याप्रमाणे गत पाच वर्षे फडणवीस यांनी अपक्ष आमदारांना सांभाळलं त्या तुलनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्ष आमदारांना सांभाळले नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला.