एडिज एजिप्ती डासांच्या उत्पत्तीसाठी अनेक ठिकाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:01:43+5:30
अमरावती शहरात डेंग्यूरुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने पॉम्प्लेटद्वारे जनजागृती सुरू केली. मात्र, शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. डेंग्यूचा ताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ही अशा पाण्यात होते.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वच्छ पाण्यात अंडी देणाऱ्या आणि डेंग्यू आजार पसरविणाºया एडिज एजिप्ती डासांंच्या उत्पत्तीची अनेक ठिकाणे शहरात असण्याची शक्यता आहे. कॅम्प रोड स्थित सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील एका अर्धवट तयार झालेल्या संकुलातील तळमजल्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाचे पाणी साचलेले आहे. तेथे मोठ्या प्रमाणात डास उत्पत्ती होत असावी. त्याचप्रमाणे शहरातील असे अनेक ठिकाण आहेत, जेथे पाणी साचलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यूची भीती दाटली आहे.
अमरावती शहरात डेंग्यूरुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने पॉम्प्लेटद्वारे जनजागृती सुरू केली. मात्र, शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. डेंग्यूचा ताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ही अशा पाण्यात होते. कॅम्प रोड स्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढेच एक व्यापारी संकुल गेल्या काही वर्षांपासून अर्धवट बांधकाम स्थिती आहे. या संकुलातील तळमजल्यावर पाणीच पाणी आहे. मात्र, या पाण्याकडे संकुलाचे मालक तसेच महापालिकेनेही दुर्लक्ष केले आहे. तेथील साचलेले पाणी डेंग्यूला आमंत्रण देणारेच ठरत आहे. हीच स्थित शहरातील अनेक ठिकाणी पाहायला मिळत असून, याकडेही महापालिकेने गांभीर्याने बघायला हवे, अशी अमरावतीकरांची मागणी आहे. दरम्यान, आठवड्यातून एक दिवस कोरडा, मच्छरदाणी, मॉस्किटो रिपेंलट वापरूच, पण डासांच्या उत्पत्ती ठिकाणांकडे महापालिकेने दुर्लक्ष करून नये, या पाण्याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
इर्विनमध्ये महिन्याभरात डेंग्यूचे १७ संशयित
डेंग्यूचे महिन्याभरात जिल्हा सामान्य रुग्णालयात १७ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. रुग्णांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर डेंग्यू पॉझिटिव्हची निश्चीत संख्या कळेल. डेंग्यूचा प्रकोप वाढू नये, यासाठी महापालिका यंत्रणा कामी लागली आहे. तथापि, डेंग्यूसह मलेरिया, न्यूमोनिया, टायफॉइड आजारानेही तोंड वर काढले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमुळे रुग्णालयातसुद्धा गर्दी वाढलेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात महिन्याभरात तापाचे दोन हजारांवर रुग्ण दाखल झाले असून, त्यात १७ डेंग्यूसदृश, चार मेंदूज्वराचे, चार मलरियाचे, २०७ टायफॉइडचे, १२ न्यूमोनियाचे रुग्ण आहेत.
येथे आढळले डेंग्यूचे रुग्ण
शहरात २५, तर ग्रामीण भागात १२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूची लागण झालेले नागरिक शहरातील महेंद्र कॉलनी, राधानगर, मनकर्णानगर, गाडगेनगर, पॅराडाइज कॉलनीतील आहेत. यातील काही रुग्णांचे अमरावती येथील, तर काही रुग्णांचे नागपूर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षांत चैतन्य कॉलनी व पार्वतीनगर परिसरात डेंग्यूने उच्छाद मांडला होता. यंदाही तीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
१२० आशा वर्करांच्या घरोघरी भेटी
महापालिकेमार्फत शहरातील १२० आशा वर्कर नागरिकांच्या घरी जाऊन तेथील डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून नष्ट करीत आहेत. प्रत्येक आशा वर्कर दररोज २५ ते ३० घरांना भेटी देत आहे.
आरोग्य विभागाच्या सूचनेप्रमाणे गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूविषयक जनजागृती सुरु आहे. साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे काम सातत्याने सुरुच आहे. कुठेही साचलेले स्वच्छ पाणी आढळल्यास आम्हाला कळवा.
- विशाल काळे, आरोग्य अधिकारी, महापालिका.