मराठ्यांचा लढा आत्मसन्मानाचा !
By admin | Published: September 19, 2016 12:07 AM2016-09-19T00:07:06+5:302016-09-19T00:07:06+5:30
शहरामध्ये २२ ला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मराठ्यांच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याने ...
शाळांना द्यावी सुटी : आयोजन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अमरावती : शहरामध्ये २२ ला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.हा मराठ्यांच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याने या मोर्चाच्या निमित्ताने शहरात अभुतपूर्व गर्दी उसळणार आहे. त्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय शाळा बंद ठेवाव्यात, असा मागणीवजा पत्रव्यवहार सकल मराठ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला आहे.
सोमवार १९ ला जालना येथे मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी जालना शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.त्याच धर्तीवर अमरावतीमध्येही तीच विनंती करण्यात आली आहे. आयोजन समितीकडूनही शाळांना २२ सप्टेबरला सुटी देण्याची विनंती करण्यात आली आहे. रविवारी येथील गौरी इन मध्ये मोर्चाच्या अनुषंगाने अंतिम नियोजन बैठक घेण्यात आली. मोर्चानिमित्त शहरात येणाऱ्यांची संख्या, त्यासाठी पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, कृत्रिम शौचालये, मोर्चाची वेळ, पाणी व अन्य व्यवस्था याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मोर्चात सुरक्षेसाठी सुमारे २ हजारांहून अधिक स्वंयसेवक तैनात राहणार आहेत. याशिवाय अॅम्ब्युलन्स आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहिल. ५०० पेक्षा अधिक मराठा वकील बांधव ड्रेसकोडमध्ये मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान मराठा समाजाचे आतापर्यंत निघालेले मूकमोर्चे अत्यंत शांततेत व शिस्तीत निघाले आहेत. त्यामुळे अमरावतीचा मोर्चा याच शिस्तीने निघेल, प्रशासनावर कुठलाही ताण येणार नाही,याचे खबरदारी आपण सामूहिकपणे घेऊ, असे या बैठकीत ठरविले गेले. हा मूक मोर्चा असल्याने कुठलीही घोषणाबाजी होणार नाही, याचे आत्मभान सकल मराठ्यांनी ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.
येथे राहील पार्किंग व्यवस्था
गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, दसरा मैदान,विधी महाविद्यालयाचे प्रांगण, नरसम्मा महाविद्यालयाचे प्रांगण, सायंस्कोर मैदान,जिल्हा स्टेडियम, धर्मदाय कॉटन फंड, शिवाजी शारिरिक महाविद्यालयाचे प्रांगण, रुरल कॉलेज, विद्याभारती महाविद्यालय, जोग स्टेडियम, येथे पार्किंग व्यवस्था राहणार आहे.
आज स्वयंसेवकांची कार्यशाळा
सोमवारी दुपारी जुन्या बायपासवरील माऊली पॉर्इंट येथे स्वयंसेवकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. दोन हजारांच्यावर स्वयंसेवकांना कार्यशाळेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेचे धडे दिले जाणार आहेत. याशिवाय मोर्चातील त्यांचे स्थान निश्चित केले जाणार आहे.