Maratha Reservation: मराठा आरक्षणाला भाजप अन् संघाचाच विरोध - डॉ. आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 06:24 PM2018-08-03T18:24:47+5:302018-08-03T18:25:19+5:30
Maratha Reservation :मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात रान पेटले असले तरी संघ आणि भाजपचाच आरक्षणाला विरोध आहे. शासनकर्त्यांची मराठा आरक्षणसंदर्भात मानसिकता नाही, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.
अमरावती : मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात रान पेटले असले तरी संघ आणि भाजपचाच आरक्षणाला विरोध आहे. शासनकर्त्यांची मराठा आरक्षणसंदर्भात मानसिकता नाही, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अमरावतीत पत्रपरिषदेत बोलत होते. मराठा आरक्षणाची मागणी ‘इंस्टंट’ नाही. ती १९८१ पासूनच आहे. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीने काहीही केले नाही. मात्र, गतवेळी सत्ता सोडताना मराठा आरक्षणाची घोषणा केली. त्यानंतर आजपर्यंत मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम असल्याचेही ते म्हणाले.
मराठा तरूणांनी आता आरक्षण मिळविणारच असा चंग बांधला आहे. त्यामुळे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत मराठा आरक्षणाची मागणी धगधगते आहे. मध्यंतरी भाजप-सेना सरकारला मराठा आरक्षण संदर्भात अधिसूचना काढण्याची संधी होती. तथापि, ही संधी राज्य सरकारने गमावली आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी अगोदर घटनेत दुरूस्ती करावी लागेल. मसुदा मांडला गेला पाहिजे. त्यानंतरच आरक्षणाबाबत मार्ग निघेल. मात्र, संघ आणि भाजपने संविधानाचा दाखला देत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असे नवे पिल्लू काढले. संविधानात कोठेही आरक्षणाची टक्केवारी नमूद नाही. परंतु, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात याचिकेवर निर्णय देताना प्रिन्सिपल आणि रूल्स मांडले आहेत. त्यासाठी घटनेत दुरूस्ती करता येते, असे अॅड. आंबेडकरांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री दशरथ भांडे, आमदार विजय मोरे, लक्ष्मण माने, गुणवंत देवपारे, अॅड. नंदेश अंबाडकर आदी उपस्थित होते.
जुनी लिडरशीप धोक्यात
मराठा आरक्षण आंदोलनाला कोणी अमूक नेता लिड करीत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आरक्षण मागणीचे आंदोलन कोणी पेटवतो, असे म्हणने संयुक्तिक नाही. मराठा तरूण आरक्षण मिळविणारच अशी टोकाची भूमिका घेत असल्याने आता जुनी लिडरशीप धोक्यात आल्याचे भाकीत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी वर्तविले. मराठा समाजाचे आमदार, खासदार अन्य लोकप्रतिनिंधी आरक्षणासाठी काय केले, हा जाब मराठा तरूण ९ ऑगस्टपूर्वी विचारणार असल्याचे शुभसंकेत मानले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसकडे प्रस्ताव
भाजपने पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांना आमची साथ राहील. देशातील आगामी लोकसभा निवडणुका ‘संविधान बचाव’ मोहिमेच्या मुद्द्यावर होणार आहे. त्याकरिता काँग्रेसकडे वंचित बहुजन आघाडीने राज्यात लोकसभेच्या १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ४८ जागांवर निवडणुका लढविल्या जातील, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.