आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 01:33 AM2018-07-27T01:33:28+5:302018-07-27T01:34:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज चांदूर बाजार शहरात गुरुवारी रस्त्यावर आला. शिवाजी चौकात काकासाहेब शिंदेंना श्रद्धाजली वाहिल्यानंतर शासनाचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण तत्काळ लागू करा, या मागणीसाठी मराठा समाजबांधवांनी शिल्पा बोबडे व पोलीस निरीक्षक अजय आखरे यांना निवेदन दिले.
मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. त्यांना स्मरून मराठा समाजबांधवांनी पंचायत समिती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच सरकारचा निषेधसुद्धा नोंदवण्यात आला. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने चांदूरबाजार तहसीलवर धडक दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे काकासाहेब शिंदे यांच्यासह अनेक निष्पापांच्या गेलेल्या बळींचे विस्मरण होऊ देऊ नका, अशा आशयाचे निवेदन याप्रसंगी समाजबांधवांनी सादर केले. निवेदन व श्रद्धांजली देतेवेळी नगरसेवक नितीन कोरडे, शुभम सपाटे, सुमीत घोम, शिशिर माकोडे, रोशन ठाकरे, शुभम किटुकले, प्रणीत शेखर, तुषार देशमुख, निखिल काटोलकर, विकी देशमुख, अक्षय देशमुख, रूपम विधाते, वैष्णव राऊत, शुभम काकडे, अक्षय कडू, विश्वास बंड, दत्ता देशमुख, मुन्ना बोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता.