मराठी विद्यापीठ रिद्धपूरलाच हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:01 AM2018-03-02T01:01:46+5:302018-03-02T01:01:46+5:30
शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. तथापि, मराठीतील दोन्ही आद्यग्रंथांचे लेखन रिद्धपूरला झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावे,
ऑनलाईन लोकमत
अमरावती : शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. तथापि, मराठीतील दोन्ही आद्यग्रंथांचे लेखन रिद्धपूरला झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावे, अशी मागणी अखिल भारतीय महानुभाव परिषदद्वारा गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
मराठीमधील आद्य गद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’ तसेच आद्य पद्य ग्रंथ ‘महदंबेचे धवळे’ यांचे लेखन रिद्धपूर येथे झाले. आद्य संशोधक, चरित्रकार माहिमभट्ट यांनी येथेच ‘वाजेश्वरी’ या स्थानावर शके १२०० मध्ये लीळाचरित्राची निर्मिती केली. या गं्रथामुळेच मराठीची ओळख व नावलौकिक झाला. ही मराठी भाषिकांसाठी व भाषेसाठी गौरवाची बाब आहे. येथेच महानुभावीय संतांनी लिखाण केले आहे. येथेच हजारोंच्या संख्येत हस्तलिखिते पूर्वजांचा वारसा म्हणून जतन केलेली आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भेटीदरम्यान मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच होण्यास सहमती दर्शविली. मात्र, आता मराठी विद्यापीठ मुंबई येथे नेण्याचा घाट रचला जात आहे. हा मराठीवर, लीळाचरित्रावर, महानुभावीय वाङ्मयावर तसेच मराठी भाषिकांवर अन्याय करणारा निर्णय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष श्री गोपीराजबाबा ऋषीराजस्वामी, सुभाष पावडे, विलास इंगोले, अशोक राऊत, राजेंद्र भोळे, सुदाम बिडकर, रणजित पावडे, मनीष देशमुख, अभिजित काळबांडे, नितीन देशमुख, निशू शेवळीकर, विनोद कराळे, भगवान मुंदडा, सुरेश पावडे, अरुण ठाकरे, सुभाष चर्जन, राजेंद्र अडसडे, रवींद्र कोठीकर, दादाराव फाटे, संदीप जुनघरे, रणजित पावडे, राजू भेले उपस्थित होते.