मराठमोळी धनुर्धर साक्षी तोटे जागतिक आशिया कप स्पर्धेत खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:34 PM2019-06-26T18:34:14+5:302019-06-26T18:35:09+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत एकलव्य क्रीडा अकादमीतील अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत साक्षीचा वयाच्या अकराव्या वर्षी प्रवेश झाला. लाकडी धनुष्यापासून तिने सुरुवात केली.
नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : रोहतक (हरिणाया) येथे २४ व २५ जून रोजी पार पडलेल्या धनुर्विद्या चाचणीत व मुद्रित (स्पेन) येथे १९ ते २५ जून दरम्यान झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर (जि.अमरावती) येथील एकलव्यची विद्यार्थिनी साक्षी तोटे उत्कृष्ट कामगिरी बजावली. तसेच १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत चायनीज तपोई व फिलिपाईन्स येथे ८ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया कप अशा तीनही आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी साक्षीची निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत एकलव्य क्रीडा अकादमीतील अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत साक्षीचा वयाच्या अकराव्या वर्षी प्रवेश झाला. लाकडी धनुष्यापासून तिने सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके तिने मिळविले आहेत. सोबतच क्रीडा शिष्यवृत्तीसह अनेक बक्षिसे तिने प्राप्त केली आहेत. यापूर्वीही साक्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीत पात्र ठरली होती. संघर्षातून तिने आजपर्यंत तीन देशांत धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवडीस पात्र ठरली आहे. प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनात सराव करते. येथील 120 विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या उंबरठ्यावर आहेत. संस्थेचे संस्थापक सदानंद जाधव, विलास मारोटकर, विशाल ढवळे, राजेंद्र लवंगे, उमेश परसनकर, सचिन लोमटे, महेंद्र मेटकर, अनिल निकोडे, पवन जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.