धामणगाव मतदारसंघातील मुद्यावर मॅरेथॉन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:45 AM2018-12-14T00:45:58+5:302018-12-14T00:46:48+5:30
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत गुरुवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आ. वीरेंद्र जगताप यांनी आढावा बैठक घेतली. सार्वजनिक हिताच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत गुरुवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आ. वीरेंद्र जगताप यांनी आढावा बैठक घेतली. सार्वजनिक हिताच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.
पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे काम त्वरित सुरू करावे. समृद्धी महामार्गाला छेदणाऱ्या कालव्यांतून पुढील शेतकºयांना सिंचनाचे नियोजन करावे. चिंचपूर, शिदोडी येथील स्थलांतरित लाभार्र्थींना घरकुलाच्या फरकाची रक्कम त्वरित देण्यात यावी. वरूड बगाजी, येरली, चिंचपूर येथील १० पैकी चार रस्त्यांची कामे अतिक्रमणामुळे अपूर्ण आहेत. या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
पुनर्वसन गावठाणातील अपूर्ण नागरी सुविधेची कामे, वरू ड बगाजी येथील इंदिरा आवास योजनेतून वगळण्यात आलेल्या ३८ प्रकल्पग्रस्तांना अनुदान प्रस्तावावर कोणती कार्यवाही केली, याचा लेखाजोखा आ. वीरेंद्र जगताप यांनी घेतला. धामक हे बेंबळा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राबाहेर येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह अन्य कामे जुन्याच ठिकाणी सुरू करावी, अशी सूचना जगताप यांनी केली. घुईखेड येथील प्रकल्पग्रस्त बेघरांना शासकीय भूखंड, पाणीपुरवठा योजना त्वरित देण्याचे निर्देश दिले. विकासकामे व जनहिताचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी विविध यंत्रणाच्या प्रमुखांना दिले. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात राज्य व राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात मंजूर असलेल्या ट्रामा केअर युनिट कार्यान्वित करण्याची मागणी आ. जगताप यांनी केली. ही कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश आयुक्तांनी सबंधितांना दिले.