कर्जमाफीसाठी उजाडणार मार्च-एप्रिल, शेतक-यांची दिवाळी गोड नाहीच, मंत्र्यांच्या दाव्यांना किशोर तिवारींचा सुरुंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:53 PM2017-09-28T17:53:15+5:302017-09-28T17:53:32+5:30
दस-यानंतर कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होईल, शेतकºयांची दिवाळी गोड होईल, असा दावा राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार करीत आहेत. परंतु, सरकारचाच एक घटक असलेल्या शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मात्र मंत्र्यांच्या या दाव्यांना सुरूंग लावला आहे.
- राजेश निस्ताने
यवतमाळ - दस-यानंतर कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होईल, शेतकºयांची दिवाळी गोड होईल, असा दावा राज्यातील सत्ताधारी मंत्री, आमदार करीत आहेत. परंतु, सरकारचाच एक घटक असलेल्या शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मात्र मंत्र्यांच्या या दाव्यांना सुरूंग लावला आहे. प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी किमान मार्च-एप्रिल उजाडणार असून यंदाची शेतक-यांची दिवाळी गोड नाहीच, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभरातील शेतक-यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. या माफीची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याबाबतचे वेगवेगळे मुहूर्त सत्ताधा-यांकडून सतत जाहीर केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात ही माफी लांबणीवर पडत आहे. माफीसाठी लागणा-या निधीची जुळवाजुळव करण्यासाठी तपासणी, आॅडिटच्या नावाखाली सरकारचा टाईमपास सुरू असल्याची विरोधकांची ओरड आहे. त्यांची ही ओरड आता खरी वाटू लागली आहे. कारण राज्यमंत्र्यांच्या दर्जाचे पद सांभाळणा-या शेतकरी नेत्यानेच त्याला अधिकृत दुजोरा दिला आहे.
गुरुवारी येथील शासकीय विश्रामभवनावर ‘माध्यमा’ला दिलेल्या मुलाखतीत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कर्जमाफीची सद्यस्थिती कथन केली. तिवारी म्हणाले, कर्जमाफीबाबत इतर राजकीय नेते काय बोलतात हे आपल्यासाठी महत्वाचे नाही. कर्जमाफीचे वास्तव वेगळेच आहे. बँकांना बुडित कर्ज मिळावे, बँकांचे संवर्धन व्हावे यासाठी कर्जमाफी दिली जाते. यापूर्वी ही बाब सिद्ध झाली आहे. यावेळीही त्या पेक्षा वेगळे काही होईल, असे वाटत नाही. दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी गोड होणार नाहीच, तशीही साखर महागली आहेच.
सरकार बँकांशी करार करणार
कर्जमाफीचा पैसा जमा केला तरी बँका शेतकºयांना नव्याने पीक कर्ज सहजासहजी देणार नाहीत. म्हणून बँकांच्या खात्यात माफीची रक्कम टाकताना व शेतकºयांचे थकीत कर्ज निल करतानाच बँकांशी सरकारकडून करार केला जाईल. नवीन पीक कर्ज शेतकºयांना देऊ याची हमी घेतली जाईल. पीक कर्जाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यासाठी किमान मार्च-एप्रिल महिना उजाडणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.
झटपट माफीचे दुष्परिणाम अधिक तिवारी म्हणाले, युती सरकारने कर्जमाफी संबंधी जी घोषणा केली, त्याची निश्चित संपूर्ण अंमलबजावणी होईल. मात्र त्यासाठी वेळ लागणार आहे. कर्जमाफी देण्यासाठी वेळ लागत नसेल आणि सरकार झटपट काही करत असेल तर त्याचे दुष्परिणामही भविष्यात भोगावे लागणार आहे.
अजूनही २००८ ची कर्जमाफी नाही
यापूर्वी अशा झटपट कर्जमाफीचा अनुभव २००८ मध्ये दिसून आला. आजही विदर्भातील अनेक शेतक-यांना त्यातील कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीला लबाडाचे आमंत्रण संबोधणा-या नेत्यांनी या सरकारला शहाणपन शिकविण्याची गरज नाही. कारण लबाडाचे आमंत्रण कोण देते आणि लबाडी नेमकी कुणी केली, हे जनतेला चांगले ठाऊक असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.