मार्च एंडिंगचा ताळेबंद आॅनलाईन!
By admin | Published: March 28, 2016 12:05 AM2016-03-28T00:05:36+5:302016-03-28T00:05:36+5:30
एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. त्यामुळे आठवडाभर मार्च एंडिंगची तयारी करा, ...
कोअर बँकिंगमुळे सुलभता : संगणकीकरणाचा लाभ
अमरावती : एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. त्यामुळे आठवडाभर मार्च एंडिंगची तयारी करा, हिशेबाची जुळवाजुळव करा, असे प्रकार आता कालबाह्य झाले आहेत. बहुतांश विभाग आॅनलाईन अपडेट राहत असल्याने मार्च एंडिंगच्या डोकेदुखीचा त्रास कमी झाला आहे. बँकामध्ये तर कोअर बँकिंगमुळे त्या दिवशीच्या ठेवी, कर्ज, थकबाकी, नफा व व्याज निघत असल्याने मार्च एंडिंग सुसह्य बनला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसह नागरी सहकारी संस्था, बाजार समिती, बँका, पतसंस्था आदी व अन्य शासकीय विभागाला ३१ मार्चपूर्वी निधीचा विनियोग सादर करावा लागतो. तथापित बहुतांश ठिकाणी संगणकीकरण झाल्याने सेवा सुलभ झाल्या आहेत. बँकासह शासकीय व निमशासकीय कार्यालयातही मार्च एंडिगची धावपळ सुरू आहे. गुरुवारपासून सलग चार दिवस सुट्या आल्यानंतर सोमवार, २८ पासून बँकाचे व्यवहार व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज पूर्ववत होईल. सुट्यांमुळे बँकाचे व्यवहार बंद होते. तरीही कोअर बँकिंग प्रणालीमुळे उर्वरित काही दिवसांत बँकेची ३१ मार्च अखेर करावी लागणारी कामे पूर्ण होण्यास मदत होणार आहे. कोअर बँकिंग प्रणालीने मार्च एंडिंगसाठी लागणारे काम ९० टक्क्यांनी कमी केले. बॅकेत दररोज होणाऱ्या व्यवहाराचे ताळेबंद त्याच दिवशी अपडेट होतात. त्यामुळे दिवसाला आणि महिन्याला किती कर्जवाटप झाले. ठेवी व वसुली, थकबाकी, नफा याची तपशीलवार माहित तत्काळ मिळू लागले.
पारंपरिक पद्धतीने हिशेब
ज्या संस्था संगणकीकृत आहेत, अशांना ३१ मार्चचा हिशेब लावण्यास कमी कालावधी लागेल तर ज्यांच्याकडे संगणकीय प्रक्रिया नाही, अशा संस्थांना मात्र पारंपरिक पध्दतीनेच हिशेब लावण्याचे काम करावे लागणार आहे. ज्या दिवशी या सर्व संस्था आॅनलाईन होतील, त्यावेळी आर्थिक वर्षअखेरची कामे गतीने पूर्ण करता येणार आहेत.
जुळवणी सुरू
मार्च एन्ड अवघ्या तीन दिवसानंतर आल्याने निधी अखर्चित राहू नये, परत जाऊ नये, यासाइी शासकीय विभाग कामाला लागला आहे. पूर्ण झालेल्या शासकीय योजनांची बिले काढणे, नवीन कामाचे नियोजन शिल्लक राहणारा निधी यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात विचार विनिमय होत आहे. आर्थिक ताळेबंदाची जुळवणी सुरू आहे.