रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी नेरपिंगळाईत बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:34+5:302021-07-15T04:10:34+5:30
तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा ...
तिवसा ते रिद्धपूर हा रस्ता गावातून अरुंद असल्याने अनेकदा अपघाताचे प्रकार घडतात. जीवितहानीच्या घटनासुद्धा या मार्गावर घडल्या आहेत. हा राज्य मार्ग असून तिवसा, नागपूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडला आहे तसेच रिद्धपूरहून परतवाडा-इंदोर- खंडवा या मार्गाशी जोडला आहे. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होते. गावाच्या मुख्य बाजारपेठेमधून हा मार्ग जात असल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँक, दवाखानेदेखील याच मार्गावर असल्याने नागरिकाची वर्दळ असते.
सद्यस्थितीत हा मार्ग अतिक्रमणाने वेढला असून पादचाऱ्यांना चालतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. या मार्गाचे रुंदीकरण करावे, या मागणीकरिता ग्रामपंचायत सदस्य व प्रहार रुग्ण समिती तालुकाध्यक्ष रूपेश गणेश यांनी १२ जुलैपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून १४ जुलै रोजी व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली.
मंजूर झालेला रस्ता हा १६ मीटरचा व्हावा. अतिक्रमण काढल्यास दुकानदार व घरमालकास सरकारी नियमानुसार मोबदला द्यावा. रस्त्याच्या मधातून दुभाजक व पथदिवे बसवावे आदी मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा रूपेश गणेश यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.