बाजार समिती; निवडणूक खर्चासाठी एक लाखाची मर्यादा
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 25, 2023 06:10 PM2023-03-25T18:10:13+5:302023-03-25T18:11:39+5:30
खर्चाला घालावा लागेल लगाम, दोन महिन्यात द्यावा लागेल हिशोब
अमरावती : बाजार समिती निवडणुकीत आता उमेदवारांना सावधपणे खर्च करावा लागणार आहे. यावेळी प्राधिकरणाने एक लाखांची खर्च मर्यादा दिलेली आहे. हा उमेदवारी खर्च मतमोजणीच्या ६० दिवसांच्या आत प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा लागणार आहे.
राज्य सहकारी प्राधिकरणाने २० मे २०२० रोजी अधिसूचना काढली होती. त्यानुसार सहकारी संस्थांचे तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना निवडणूक खर्च करण्यास एक लाखांची खर्च मर्यादा देण्यात आलेली आहे. तीच मर्यादा यावेळीदेखील कायम राहण्याची शक्यता असल्याचे सहकार विभागाने सांगितले. याशिवाय १५ मार्च २०२३ च्या राजपत्रानूसार निवडणूक खर्चाचा उमेदवाराला स्वतंत्र हिशोब ठेवावा लागणार आहे.
निवडणूक खर्चाच्या लेख्यासह पावत्याही सादर कराव्या लागतील. उमेदवारी खर्च न दिल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी संचालकास अहवाल सादर करतील व उमेदवाराचे म्हणने ऐकूण घेण्यासाठी एकवेळ संधी देण्यात येणार आहे व योग्य न वाटल्यास संबंधिताला आदेशाचे दिनांकापासून पुढील तीन वर्ष कालावधीसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.
यावेळी १० गुंठे क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यास सोसायटी व ग्रामपंचायत या मतदारसंघातून उमेदवार होता येणार आहे. या शेतकरी गट असणाऱ्या मतदारसंघात १५ संचालक निवडून येणार आहेत. या अनुषंगाने अनेकांनी जोरदार तयारी सुरु केलेली आहे.