बाजार समितीतील बिहारी मजुरांची होणार चौकशी
By admin | Published: November 23, 2015 12:16 AM2015-11-23T00:16:34+5:302015-11-23T00:16:34+5:30
बाजार समितीत परवानगीविना वास्तव्यास असलेल्या बिहारी मजुरांची दखल शहर पोलीस आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने घेतली आहे.
पोलीस उपायुक्तांचे आदेश : सहायक आयुक्त कामगार कार्यालयाचीही दखल
अमरावती : बाजार समितीत परवानगीविना वास्तव्यास असलेल्या बिहारी मजुरांची दखल शहर पोलीस आणि सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. हे मजूर आले कसे, त्यांचा इतिहास काय, त्यांचे पोलीस रेकॉर्ड काय, यासंबंधाची बारकाईने चौकशी करून त्यांच्यात कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमिचे इसम तर नाहीत ना?, याचाही तपास पोलीस करणार आहेत.
बाजार समितीत असलेल्या मराठी मजुरांच्या हक्कावर घाला घालणाऱ्या बिहारी मजुरांना मराठी मजुरांनी विरोध दर्शविला आहे. हे बिहारी मजूर विनापरवानगीने बाजार समितीत वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्यात काही गुन्हेगार तर नाहीत ना, अशी भीती मराठी मजुरांनी व्यक्त केली होती. याकडे आता पोलीस व सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने लक्ष वेधले आहे.
बिहारी मजुरांची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारी डी.बी.जाधव यांच्या निर्देशानुसार माथाडी निरीक्षक बाजार समितीतील बिहारी कामगारांच्या नोंदींबाबत चौकशी करणार आहेत. अमरावती बाजार समितीमधील १ हजारांवर माथाडी कामगारांच्या नोंदी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात आहेत. मात्र, आता बाजार समितीत आलेल्या नवीन बिहारी कामगारांच्या नोंदी अद्याप करण्यात आल्या नाहीत. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी नवीन कामगारांच्या नोंदी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप बिहारी कामगारांच्या नोंदी न झाल्याने माथाडी निरीक्षकांमार्फत बिहारी कामगारांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात आता माथाडी निरीक्षक कामगारांची ओळखपत्राच्या आधारावर चौकशी करून नोंदी घेणार आहेत. यामुळे बिहारी मजुरांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)