पथ्रोटमध्ये बाजार भरला, नागरिक सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:05+5:302021-08-29T04:15:05+5:30
बैलाच्या साजाची दुकाने सजली, खरेदीदार नसल्याने व्यापारी हिरमुसले पथ्रोट : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भर ओसरल्यानंतर आता बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर ...
बैलाच्या साजाची दुकाने सजली, खरेदीदार नसल्याने व्यापारी हिरमुसले
पथ्रोट : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भर ओसरल्यानंतर आता बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पथ्रोट येथील बाजार शुक्रवारी भरला. बैलाच्या साजाची दुकाने सजल्याने नागरिक सुखावले आहेत. तथापि, खरेदीदार मिळत नसल्याने लाखो रुपयांचा माल विक्री न झाल्याने व्यापारी हिरमुसले. सध्या गोधनच नसल्याने नवीन दोर, कासरे, मठाट्या, झूल, शिंगोटीस लावायचा रंग खरेदी करायचा कुणाकरिता, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाकाळात शासनाच्या आदेशाने सर्वच प्रकारची दुकाने बंद होती. किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून बैलांच्या साजाच्या सामानांची खरेदी केली नव्हती. बऱ्याच शेतकऱ्यांना बैलांच्या साज मिळाला नसल्याने मागील वर्षीचा जुना साज बैलजोडीला चढवून ती तोरणाखाली उभी न करता गोठ्यातच घाट लावून पोळा साजरा केला होता. यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने २५००० लोकसंख्येच्या पथ्रोट येथे बाजार भरला. परिसरातील रामापूर, जवळापूर, कासमपूर शिंदी, परसापूर, वागडोह, गोंडवाघोली, कुनभी वाघोली, पायविहीर, पांढरी, आदी गांवखेड्यातून शेतकरी, नागरिक आठवडी बाजारात खरेदीसाठी करतात. तथापि, ग्रामीण भागातील गोधन संपुष्टात आले तसेच यांत्रीकीकरणासह गुरे राखणारे तसेच घरगडी मिळत नसल्याने बऱ्याच शेतकर्यानी महागडी बैलजोडी ठेवणे कमी केले. त्यामुळे बैलाच्या साजाच्या दुकानाकडे फारसे कुणी फिरकले नसल्याची खंत दुकाणदारानी व्यक्त केली.
पुन्हा बाजार आला रस्त्यावर
ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे व तत्कालीन ठाणेदार नरेंद्र डंबाळे यानी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन नेमून दिलेल्या जागेवर लावण्याची सक्ती केल्याने बाजारास शिस्तबद्धता आली होती. टाळेबंदीनंतर मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षाने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मुख्य मार्गावर लावली होती. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.