सोळाव्या वर्षी लग्न, सतराव्या वर्षी प्रसुती, बाळ दगावले; २४ वर्षीय तरुणाविरूध्द बलात्काराचा गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: February 5, 2024 07:13 PM2024-02-05T19:13:00+5:302024-02-05T19:13:13+5:30
१६ वर्षांची असताना आपल्या वडिलांनी आपले लग्न लावून दिले. त्यातून ते बाळ जन्मल्याचे बयान पीडित अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलिसांना दिले आहे.
अमरावती : अचलपूर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीची जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुती झाली. प्रसुतीनंतर तिचे नवजात बाळ दगावले. दरम्यान, ती अल्पवयीन असल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी, अचलपुरातील एका २४ वर्षीय तरुणाविरूध्द बलात्कार व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गाडगेनगर पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी पहाटे २:१९च्या सुमारास गुन्हा नोंदवून तो गुन्हा अचलपूर पोलिसांकडे वर्ग केला. १६ वर्षांची असताना आपल्या वडिलांनी आपले लग्न लावून दिले. त्यातून ते बाळ जन्मल्याचे बयान पीडित अल्पवयीन मुलीने गाडगेनगर पोलिसांना दिले आहे.
बयानानुसार, पीडित मुलीच्या आईचे सन २०२२मध्ये निधन झाले. त्यामुळे तिच्या पित्याने ती अल्पवयीन असूनदेखील जानेवारी २०२३मध्ये तिचे अचलपुरातील एका तरुणाशी लग्न लावून दिले. त्यानंतर ती सासरी राहायला गेली. तेथे ती पतीपासून गर्भवती राहिली. दरम्यान, सोनोग्राफीमध्ये गर्भातील बाळाच्या किडनीणीवर सूज आल्याने प्रसुतीत अडचण निर्माण होईल, असे तिला अचलपूरच्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात आणण्यात आले. येथे तिची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला, तर दुसरीकडे तिच्या वयाची खातरजमा केली असता, ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने बालसंरक्षण कक्षासह गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ रुग्णालय गाठून प्रसुत अल्पवयीन मुलीचे बयान नोंदविले. तिच्या बयानानुसार, तिचे लग्न झाले असले, तरी ती अल्पवयीन माता बनल्याने तिच्या कथित पतीविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.