नवरदेवानेच लावून दिले वाग्दत्त वधूचे प्रियकरासोबत लग्न

By admin | Published: June 19, 2017 12:06 AM2017-06-19T00:06:22+5:302017-06-19T00:06:22+5:30

मोठ्या थाटामाटात वरातीसह इंदूरहून येथे आलेल्या नवरदेवावर पुढाकार घेऊन स्वत:च्या वाग्दत्त वधुचा तिच्या प्रियकरासोबत विवाह लावून देण्याची वेळ आली.

Married with the bride of a betrothed bride, gave it to Navaradee | नवरदेवानेच लावून दिले वाग्दत्त वधूचे प्रियकरासोबत लग्न

नवरदेवानेच लावून दिले वाग्दत्त वधूचे प्रियकरासोबत लग्न

Next

पोलिसांनी घेतला पुढाकार, ठाण्यात शुभमंगल नवरदेव मात्र नवरीविनाच परतला
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : मोठ्या थाटामाटात वरातीसह इंदूरहून येथे आलेल्या नवरदेवावर पुढाकार घेऊन स्वत:च्या वाग्दत्त वधुचा तिच्या प्रियकरासोबत विवाह लावून देण्याची वेळ आली. पालकांच्या दबावाने बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेल्या मुलीचा पोलिसांच्या साक्षीने विवाह लावून हा नवरदेव मात्र रिक्तहस्तेच इंदूरला परतला. ही घटना रविवारी घडली. दिवसभर शहरात याच घटनेची चर्चा रंगली होती.
विस्तृत माहितीनुसार, येथील अयोध्यानगरातील एका कुटुंबाने अकोला येथील विना वडिलांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सदर मुलीचा विवाह इंदूर येथील युवकाशी निश्चित केला होता. सर्व तयारीनंतर मोठ्या थाटामाटात १७ जून रोजी म्हणजे शनिवारी साक्षगंध पार पडले. रविवारी त्यांचा विवाह होणार होता. त्यासाठी साबू मंगल कार्यालयात जय्यत तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, दरम्यानच्या काळात मुलीच्या प्रियकराने त्याच्या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून नवरदेवाला निरोप धाडला.
समजूतदारीने मुद्दा हाताळला
मोर्शी : तो ज्या मुलीसोबत लग्न करणार आहे, तिच्यासोबत त्याचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले असल्याचे नवरदेवाला मध्यस्थांमार्फत सांगण्यात आले होते. त्यासाठी काही छायाचित्रे व अन्य पुरावेदेखील प्रियकराने पाठविले होते. त्यामुळे नवरदेवाच्या तोंडचे पाणी पळाले. सांगितलेल्या बातमीत तथ्य असल्याचे लक्षात येताच नवरदेवाने ही बाब गांभीर्याने घेतली. मुलीचे आधीचे प्रेमप्रकरण असल्याने हे लग्न झाले तरी ते यशस्वी होणार नाही, हे त्याने मुलीकडच्या मंडळींसह आपल्या नातलगांनाही समजावून सांगितले. नवरदेवाच्या या भूमिकेमुळे वधूपक्षात खळबळ उडाली. सगळेच तणावात आले. मात्र, नवरदेवाने समजूतदारीने मुद्दा हाताळल्याने दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात पोहोचले.
मोर्शी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अल्का निकाळजे यांना त्यांनी घटनाक्रम दाखविला. निकाळजे यांनी आशाच्या अकोल्यातील प्रियकरासोबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधून सर्व प्रकरण समजावून घेतले. त्याने मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध कबूल करून तिचे कुटुंबीय जबरदस्तीने तिचा विवाह अन्य ठिकाणी करीत असल्याचे त्याने सांगितले. इतकेच नव्हे, तर तो सदर मुलीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचेही त्याने सांगितले. यानंतर ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांनी दोन्ही पक्षांची समजूत घालून नवरीच्या प्रियकराला तत्काळ अकोल्याहून मोर्शीला बोलावून घेतले. प्रियकर त्याच्या सहकाऱ्यांसोबत मोर्शीला पोहोचताच मोर्शी ठाण्यातच शेकडोंच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पडला. नवरदेवाने स्वत: पुढाकार घेऊन भावी वधूचा प्रियकरासोबत विवाह लावून दिल्याची ही घटना शहरात कर्णोपकर्णी पडली. त्यानंतर मोर्शी ठाण्यात बघ्यांची गर्दी जमली होती. नववधूसह तिच्या प्रियकराने मोठ्या मनाच्या नवरदेवासह पोलिसांचे आभार मानले.

मंगल कार्यालयात शुकशुकाट
शहरातील ज्या साबू मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा होणार होता तेथे घटनेनंतर शुकशुकाट दिसून आला तर मोर्शी पोलीस ठाण्याला मात्र मंगल कार्यालयाचे स्वरूप आले होते. शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला.

मुलगी व तिच्या प्रियकराची लग्न करण्याची इच्छा होती. नवरदेवानेही पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे लग्न लावून दिले. यामुळे आम्हाला पोलीस ठाण्यात एका लग्नाचे यजमान होण्याची संधी मिळाली.
-नंदकिशोर शर्मा, ठाणेदार, मोर्शी

Web Title: Married with the bride of a betrothed bride, gave it to Navaradee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.