लॅपटॉपखाली सुसाईड नोट; जाचापायी आत्मघात, पती अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 03:39 PM2023-06-22T15:39:51+5:302023-06-22T15:41:15+5:30

मृताच्या आईने नोंदविली तक्रार

Married woman commits suicide amid domestic violence | लॅपटॉपखाली सुसाईड नोट; जाचापायी आत्मघात, पती अटकेत

लॅपटॉपखाली सुसाईड नोट; जाचापायी आत्मघात, पती अटकेत

googlenewsNext

अमरावती : घरातील लॅपटॉपखाली सुसाईड नोट ठेवत ‘सासरच्या जाचापायी स्वत:ला संपवतेय!’ असे नमूद करत एक २८ वर्षीय विवाहिता फासावर झुलली. गळफास घेऊन तिने आत्मघात करवून घेतला. २० जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास येथील अमर कॉलनीस्थित शिरभाते लेआउटमध्ये ही घटना उघड झाली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी २० जून रोजी दुपारी मृत विवाहितेच्या पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनुसार, भाग्यश्री (२८, शिरभाते लेआउट) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती वैभव याला अटक करण्यात आली आहे. तिचा पती, सासू व सासऱ्याच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपला मोबाइल फोन पतीने पोर्ट करण्यासाठी दुकानात ठेवला आहे. त्यामुळे मला दोन-तीन दिवस फोन करू नको, असे १९ जून रोजी दुपारी २:३० च्या सुमारास भाग्यश्रीने तिच्या आईला कळविले. तरीदेखील तिच्या आईने सोमवारी रात्री तिला कॉल केला. मात्र, तो रिसिव्ह झाला नाही.

दरम्यान, २० जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास आरोपी वैभव याने सासरच्या मंडळीकडे अर्थात पत्नीच्या माहेरी भाग्यश्रीने गळफास घेतल्याचा कॉल केला. त्यामुळे भाग्यश्रीच्या आईसह तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी अकोल्याहून तातडीने अमरावती गाठले. शिरभाते लेआउटमध्ये पोहोचताच भाग्यश्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत दिसून आला. तोपर्यंत फ्रेजरपुरा पोलिसदेखील घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांना घटनास्थळी असलेल्या लॅपटॉपखाली एक चिठ्ठी आढळून आली. त्यात आपण पती, सासू व सासऱ्यांच्या त्रासापोटी स्वत:ला संपवायचे ठरवले आहे, असे नमूद असल्याचे पोलिसांना दिसून आले. ते अक्षर आपल्या मुलीचेच असल्याची खात्री तिच्या आईने पोलिसांना दिली. त्यानंतर मृताच्या आईने फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

पैशासाठी केला जात होता छळ

लग्नात सोन्याचे दागिने दिल्यानंतरही सासरची मंडळी आपल्या मुलीला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत होती. त्याला कंटाळून ती काही महिने माहेरीदेखील राहिली. मात्र, पुढे आम्ही त्रास देणार नाही, असा शब्द तिच्या पतीसह सासरच्यांनी दिल्याने भाग्यश्री सासरी नांदावयास गेली. मात्र, त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Married woman commits suicide amid domestic violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.