मंगल कार्यालये ठरताहेत डोकेदुखी

By admin | Published: April 5, 2015 12:27 AM2015-04-05T00:27:39+5:302015-04-05T00:27:39+5:30

येथील बहुतांश मंगल कार्यालये भरवस्तीत आहेत. त्यातील काही रोगराईला निमंत्रण देणारी ठरत आहे.

Mars offices are frustrating | मंगल कार्यालये ठरताहेत डोकेदुखी

मंगल कार्यालये ठरताहेत डोकेदुखी

Next

कार्यालयाजवळील कचरा घातक : पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा
सुनील देशपांडे  अचलपूर
येथील बहुतांश मंगल कार्यालये भरवस्तीत आहेत. त्यातील काही रोगराईला निमंत्रण देणारी ठरत आहे. मंगल कार्यालयांत होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त उठणाऱ्या पंगती व त्यानंतर उष्ट्या पत्रावळी मंगल कार्यालयाबाहेर फेकून दिली जातात. त्यामुळे दुर्गंधी तर सुटतेच व रोगराई पसरण्याची भीतीही निर्माण होते. शिवाय काही मंगल कार्यालयांना पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
अचलपुरात अनेक मंगल कार्यालये आहेत. त्यातील काही भरवस्तीत आहेत. या कार्यालयांमध्ये नेहमी विवाह समारंभासोबतच विविध कार्यक्रम होतात. या कार्यक्रमानिमित्त जेवणाच्या पंगती उठतात. परंतु या पंगतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पत्रावळ्या, द्रोण जेवणानंतर मंगल कार्यालयाच्या नजीकच खुल्या जागेत टाकले जातात. या ढिगाऱ्यावर डुकरे, मोकाट गुरे ताव मारतात. त्यामुळे एका ठिकाणी गोळा असलेला कचरा हा विखुरला जातो. या कचऱ्यातील उष्ट्या अन्नामुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मंगल कार्यालयाच्या मालकांना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
तसेच काही मंगल कार्यालयांना वाहने पार्किंगची व्यवस्था नाही. कार्यक्रमाच्या वेळेदरम्यान येथे येणाऱ्या वाहनधारकांची वाहने रस्त्यात उभी केली जातात. मंगल कार्यालये वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने तासन्तास वाहतुकीची कोंडी होत असते. नगरपालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने बांधकामाच्या वेळी नियम धाब्यावर बसवून मंगल कार्यालयाला परवानगी दिली जाते.
अचलपूर मार्गावरील हे मंगल कार्यालय असून याला मागून मौजा खेलबारी सर्व्हे नंबर ८/२ ए शिट नं. २५ मध्ये मागील ३-४ वर्षांपासून नवीन मानवी वस्ती झाली आहे. येथील रहिवाशांनी नगरपालिकेत विकास कर भरून घरे बांधली आहेत. येथील गुलाब बाग मंगल कार्यालयात लग्न समारंभ उरकल्यानंतर उष्ट्या पत्रावळ्या, द्रोण व शिळे अन्न कंपाऊंडबाहेर परिसरात टाकत असल्याने येथील रहिवासी त्रस्त आहेत. कुजलेल्या अन्नाच्या दुर्गंधीमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व मानसिकतेवर त्याचा परिणाम होत आहे. मंगल कार्यालयाचे मालक व व्यवस्थापक यांना वारंवार भेटून त्यांनी यावर काहीच उपाययोजना केली नाही, अशी लेखी तक्रार येथील रहिवाशांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यावर आशिष सोनार, प्रमोद जावेकर, राजेश होले, राजाभाऊ तट्टे, शुभांगी सोनार, मंजूषा तट्टे, प्रीती सोनार, अर्चना कैलास खानंदे, विशाखा विलास खडके, उषा उभाड, शुभांगी चांगोले, प्रतिला कास्देकर आदी रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
त्याचप्रमाणे अचलपूर येथील बिलनपुऱ्यातील दुल्हागेटच्या थोड्या अंतरावर असलेल्या के. के. लॉनमध्ये कार्यक्रमादरम्यान येणाऱ्या वाहन धारकांच्या पार्किंगचा प्रश्न सुटलेला नाही. येथे लावण्यात येणारी वाहने व फेकले जाणाऱ्या उष्ट्या पत्रावळ्या व शिळे अन्न आणि रस्त्यावर अधून-मधून फेकण्यात येणारी मोठमोठी हाडे यासंदर्भात मनीष ऊर्फ छोटू लाडोळे, गणेश पोटे, राजू पोटे, गोपाळ आवनकर, संजय भावे, दीपक सिसट, सुरेश निमकर, प्रभाकर थोरात, देवीदास इंगोले, ललित कपले, अक्षय केदार आदींनी चार महिन्यांपूर्वी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती व वाहन निरीक्षक सतीश चवरे कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते पण अजूनही वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने आम्ही त्रस्त आहोत, असे सदर रहिवाशांचे म्हणणे आहे.

उष्टे अन्न, पत्रावळी नागरिकांसाठी डोकेदुखी
जुळ्या शहरातील काही मंगल कार्यालये नागरिकांना डोकेदुखी ठरत आहेत. लग्नसमारंभ किंवा कार्यक्रमानंतर लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. उष्ट्या पत्रावळ्या व वाहन पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. मंगल कार्यालयांचे मालक नियमांचे उल्लंघन करीत असल्यास त्यांचा परवाना रद्द करावा. पण संबंधित अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळेच कारवाई होत नाही. लोकप्रतिनिधींचेही हात ओले होत असतात, असे येथील सामाजिक कार्यकर्त्या माधुरी शिंगणे यांनी सांगितले.

दीड महिन्यांपासून घंटागाडी बंद
एखादा लग्नसमारंभ तथा कार्यक्रम आमच्या कार्यालयात झाल्यानंतर आम्ही उष्ट्या पत्रावळ्या, द्रोण व कचरा एका ठिकाणी गोळा करून जाळून टाकतो. पूर्वी नगरपालिकेची गाडी येत होती. आम्ही चार्ज भरल्यानंतर ती कचरा न्यायची. मागील दीड-दोन महिन्यांपासून घंटागाडी येत नसल्याने आम्ही जाळून कचऱ्याची विल्हेवाट लावतो. आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होईल, असे कृत्य करीत नाही, असे गुलाब बागचे व्यवस्थापक रमेश बगडीया यांनी सांगितले.

आमच्या कार्यालयात कार्यक्रमानिमित्त वाहनधारकांची गर्दी झाल्यास वाहने दुल्हागेटच्या बाहेर लावली जातात. यापूर्वी आम्हाला पालिकेने नोटीस दिली होती. त्यानंतर आम्ही वाहने उभे करण्याची व्यवस्था केली. त्यामुळे आता कुठलाही त्रास नाही.
- एम. एम. खान,
संचालक, के. के. लॉन, अचलपूर.

ज्या मंगल कार्यालयाविषयी नागरिकांची तक्रार येईल त्यांना आम्ही प्रथम नोटीस देतो. त्यालाही न जुमानल्यास परवाना रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. यापूर्वी के. के. लॉनवाल्यांना कारवाई करण्याची नोटीस दिली होती.
- धनंजय जावळीकर,
मुख्याधिकारी, अचलपूर.

Web Title: Mars offices are frustrating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.