मेळघाटात व्यापक जनजागृती होणे गरजेचे

By Admin | Published: November 7, 2016 12:24 AM2016-11-07T00:24:35+5:302016-11-07T00:24:35+5:30

मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या ...

Mass awareness should be made in Melghat | मेळघाटात व्यापक जनजागृती होणे गरजेचे

मेळघाटात व्यापक जनजागृती होणे गरजेचे

googlenewsNext

नरबळी प्रकरण : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खडीमलला भेट
चिखलदरा : मेळघाटमधील अतिदुर्गम भागात खडीमल या गावात नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या निष्पाप दोन बालकांचा जीव घेण्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमिवर अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन वेळा या गावात भेट देऊन पोलीस प्रशासन, गावकरी, पीडित कुटुंबांची भेट घेतली. या घटनेमागील वस्तुस्थिती काय असावी, हे जाणून घेण्याचा प्रयत्न अंनिसने केला आहे.
पारंपरिक पूजा करण्याचा, त्यासाठी कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा मेळघाटात आहे. पण अंधश्रद्धेपोटी मानवी बळी देण्याचा घडलेला हा प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे. कुटुंबाशी व गावकऱ्यांशी बोलण्यातून असे पुढे आले की गावात शेती हंगाम संपल्यावर स्थानिक पातळीवर कुठलेही काम उपलब्ध होत नसल्याने व पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने बहुतेक कुटुंब हाताला काम मिळवण्यासाठी गाव सोडून बाहेर पडतात. काही वर्षांअगोदर सुधाकर सावलकरचे संपूर्ण कुटुंब व काही गावकरी रस्ता बांधणीच्या कामासाठी ठेकेदारांकडे गेले होते. यादरम्यान या कामावरून दुसरीकडे मजूर नेत असताना त्या वाहनाचा अपघात झाला. त्यातील बहुतेक मजूर मृत पावले. पण सुधाकर व त्याचे संपूर्ण कुटुंब त्यातून बचावले व वेळेस देवीच्या कृपेने तुम्ही वाचले, असे तेथे उपस्थितांपैकी कोणीतरी सुधाकरला म्हटले व तेव्हापासून सुधाकर देवीची भक्ती करू लागला. यातूनच तो कधीकधी देवी स्वप्नात आली, देवीने मला आदेश दिला, असे तो गावातील लोकांना सांगत होता.
निर्व्यसनी असलेला सुधाकर लोकांपासून दूर राहून नेहमी आपल्या शेती व कुटुंबात रमलेला असायचा. ऐन दिवाळीच्या दिवशी या क्रूरकर्म्याने स्वत:च्या पोटच्या गोळ्यावर कुऱ्हाडीचे सपासप वार करून आपल्या पूजेची सांगता केली. अंधश्रद्धा किती घातक असू शकते आणि अंधश्रद्धाळू माणूस किती टोकाची भूमिका घेऊ शकते, हे खडीमल गावातील या भयानक प्रकरणातून पुढे आले आहे.
एवढी क्रूर घटना घडूनदेखील शासनाचा कुठल्याही प्रतिनिधीने अजूनपर्यंत भेट दिली नाही. आदिवासी विभागाचे १२ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यात आदिवासी कुटुंबात ही घटना घडूनही कोठल्याच अधिकाऱ्याने भेट दिली नाही. यासाठी नेमलेल्या सत्यशोधन समितीत कार्याध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उमेश चौबे, महासचिव हरीश देशमुख, जिल्हा संघटक शेखर पाटील, जिल्हा सचिव हरीश केदार, उत्तम सुळके, अशोक खुजनारे, मंगेश खेरडे यांचा समावेश होता. ही सर्व मोहीम अ‍ॅड. गणेश हलकारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mass awareness should be made in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.