‘त्या’चारही भक्तांवर सामूहिक अंत्यसंस्कार
By admin | Published: May 9, 2017 12:01 AM2017-05-09T00:01:20+5:302017-05-09T00:01:20+5:30
केदारनाथ यात्रेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अमरावतीच्या चारही भाविकांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात ..
आप्तांना शोक अनिवार : अश्रूंचे पाट आणि हुंदक्यांचा कल्लोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केदारनाथ यात्रेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अमरावतीच्या चारही भाविकांवर सोमवारी शोकाकुल वातावरणात स्थानिक हिंदू स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीत चारही मृतांच्या नातलगांसह आप्तेष्टांची व शेजाऱ्यांची गर्दी उसळली होती. मृतांच्या नातलगांच्या आक्रोशाने बघ्यांचेही अश्रू आवरत नव्हते.
शनिवारी दुपारी केदारनाथकडे जाताना वाहन दरीत कोसळून अमरावतीचे चार भाविक मृत्युमुखी पडले. त्यांच्या निधनाचे वृत्त सायंकाळपर्यंत अमरावतीत येऊन धडकताच सगळीकडे खळबळ उडाली होती. रविवारी उशिरा रात्री चौघांचेही मृतदेह दोन खासगी विमानांनी नागपूरला आणण्यात आले. अमरावतीला आणल्यानंतर हे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले. पहाटे चारही मृतदेहांना त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. नातलगांच्या अंत्यदर्शनानंतर सामूहिक अंत्ययात्रा स्थानिक हिंदू स्मशानभूमीत पोहोचली. येथे चौघांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवर अग्निसंस्कार तर मृत संजय पाटील यांच्या पार्थिवावर विद्युत वाहिनीत अंत्यसंस्कार पार पडले. सकाळी ११.३० वाजता मीना मुरादे, कुंदा काळकर, चंद्रकांत काळकर आणि संजय पाटील यांची अंत्ययात्रा हिंदू स्मशानभूमीत पोहोचली. काळकर दाम्पत्याच्या पार्थिवाला मुलगा स्वप्निल याने भडाग्नी दिला. परदेशी असलेली त्यांची कन्या सपना व जावई देखील यावेळी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता चंद्रकांत काळकर हे वर्षभरापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. त्यांना एक्सटेन्शन देण्यात आले होते. एकाच वेळी दोन अंत्ययात्रा निघाल्याने काळकर कुटुंबाचा आक्रोश हृदय हेलावणारा होता.
देहरादून, दिल्लीत उपचार
अमरावती : रेखा कॉलनीतील रहिवासी संजय पाटील हे नांदगाव खंडेश्वर येथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. या अपघातात त्यांच्या अर्धांगिनी पौर्णिमा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर देहरादून येथे उपचार सुरू असून त्यांची मुलगी आईजवळच थांबली आहे. मुलगा अंत्यसंस्कारासाठी अमरावतीला पोहोचला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागातील गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधीक्षक अभियंता सुधाकर मुरादे व मीना मुरादे देखील बद्रिनाथ-केदारनाथ यात्रेला गेले होते. मात्र, भयंकर अपघातात मीना मुरादे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुधाकर मुरादे हे जखमी झाले आहेत. त्यांना देहरादून येथील हिमालय हॉस्पिटलमधून दिल्ली येथील अपोलो रूग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मीना मुरादे यांच्या पार्थिवावर त्यांचा मुलगा सर्वेशने अंत्यसंस्कार केले. सर्वेश हा पीडीएमसीमध्ये एमबीबीएसचा विद्यार्थी आहे. एमटेक झालेली मुलगी आंचल हीदेखील आईच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती.
सामूहिक अंत्यसंस्काराच्यावेळी आ. वीरेंद्र जगताप, आ.सुनील देशमुख, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील गणमान्य उपस्थित होते.
जन्म, लग्न, मृत्यू एकाच दिवशी !
मीना मुरादे यांच्यासोबत काळाने विचित्र खेळ केलाय. मीनातार्इंचा जन्म, लग्न आणि मृत्यू एकाच तारखेला घडवून काळाने आपण सर्वव्यापी, सर्वाधिकारी असल्याचे सिद्ध केलेय. मीनातार्इंचा वाढदिवस ६ मे, लग्नाची तारीख ६ मे आणि मृत्यू देखील ६ मे रोजीच. अपघातापूर्वी अनेक नातलगांनी दिलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारून लगेच मीनातार्इंचा अज्ञाताचा प्रवास सुरू झाला. दैवाची ही विचित्र खेळी त्यांच्या नातलगांच्या जिव्हारी लागली आहे.
परदेशी जाणार होते काळकर दाम्पत्य
परदेशात मागील सहा वर्षांपासून स्थायिक असलेल्या काळकर दाम्पत्याला त्यांच्या मुलीच्या भेटीची अनिवार ओढ लागली होती. त्यासाठी त्यांची जय्यत तयारीही झाली होती. तिकिटे देखील काढून झाली होती. ३० मे रोजी ते परदेशी रवाना होणार होते. शेजाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी केलेली तीर्थयात्रा त्यांची मरणयात्रा ठरली आणि मुलीलाच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित रहावे लागले.