महामानवाला अभिवादन इर्विन चौकात उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:25+5:30
इर्विन चौकातील पुतळा परिसर आंबेडकरी अनुयायांनी ‘जब तक सूरज चांद रहेगा - बाबा तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांचे लोंढे शहराच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातील विविध गावांमधून इर्विन चौकाकडे सकाळपासून येत होते. दिवसभर अफाट गर्दी होती. मात्र, यातही शिस्तबद्धता होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनी जिल्हाभरातूून अमरावतीला आलेल्या अनुयायांनी इर्विन चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पहाटेपासूनच येथे दर्शनाकरिता रिघ लागली होती.
इर्विन चौकातील पुतळा परिसर आंबेडकरी अनुयायांनी ‘जब तक सूरज चांद रहेगा - बाबा तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणांनी दणाणून सोडला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांचे लोंढे शहराच्या कानाकोपऱ्यातून तसेच जिल्ह्यातील विविध गावांमधून इर्विन चौकाकडे सकाळपासून येत होते. दिवसभर अफाट गर्दी होती. मात्र, यातही शिस्तबद्धता होती.
अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी इर्विन चौक येथे महामानवाला अभिवादन केले. आंबेडकरी तसेच सामाजिक चळवळींना वाहिलेल्या धुरिणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यामध्ये युवा, विद्यार्थी वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. याप्रसंगी डॉ. बी.आर. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान चिकित्सा शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेलबाबत जागृती करण्यासाठी स्टॉल लावला होता. दिवसभरात शेकडो नागरिकांना माहिती देण्यात आली तसेच तपासणी करण्यात आली. याशिवाय तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांची छबी असलेल्या विविध वस्तू, साहित्य घेण्यासाठी गर्दी उसळली होती. अनुयायांनी महामानवाला वंदन करून नवी ऊर्जा, स्फूर्ती प्राप्त केली.
अनुयायांकडून शिस्तबद्धतेचे दर्शन
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी इर्विन चौकात दरवर्षी होणारी अनुयायांची गर्दी ही जणू यात्रा भरल्याचा अनुभव देणारी ठरते. भीमगीते आणि बुद्धगीतांनी वातावरण भारावले होते. बाबासाहेबांच्या अनुयायांनी शिस्तबद्धतेचे दर्शन घडविले. यंदा तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या चरित्राचे विविध पैलू प्रदर्शित करणारी पुस्तके विक्रीला होती. याशिवाय मॅक्सीम गॉर्की, डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव यांची पुस्तकेदेखील होती. अनुयायांकडून तथागताच्या पितळेच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती.