जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:31 PM2018-07-11T22:31:33+5:302018-07-11T22:31:53+5:30
जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गतवर्षीपासून पाण्यासाठी आसुसलेल्या नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. पूरस्थिती कायम असल्याने वाट मिळेल तेथे पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आली असून, शेकडो हेक्टर शेतजमिनी पुराच्या पाण्याने खरडून गेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गतवर्षीपासून पाण्यासाठी आसुसलेल्या नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. पूरस्थिती कायम असल्याने वाट मिळेल तेथे पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आली असून, शेकडो हेक्टर शेतजमिनी पुराच्या पाण्याने खरडून गेली आहे. त्यामुळे गतवर्षीपासून आस लागलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात एकीकडे आनंदाश्रू, तर दुसरीकडे नुकसानीची धग दाखविली आहे.
धुंवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत
चांदूर रेल्वे
सावंगी संगम - धानोरा मोगल रस्त्यावर असलेल्या दोन नाल्यांच्या रस्त्यात अडकलेल्या चार शिक्षकांना प्रशासन व गावकऱ्यांच्या शर्र्थीच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तालुक्यात झालेल्या धुंवाधार पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले.
चांदूर रेल्वे तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या धुंवाधार पावसाने तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. घुईखेड, मोगराजवळील खोलाड व चंद्रभागा नदी तसेच गावोगावच्या नाल्यांना पूर आल्याने घुईखेड, येरंड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे येथील शेतांमध्ये पाणी शिरले. राजुरा येथील खंडेराव देशमुख माध्यमिक विद्यालयात जाणारे गजानन हरणे, अरुण भराडे व शारदा हिवरे हे तीन शिक्षक दोन नाल्यांच्या मध्ये रस्त्यात अडकले. दोन्ही बाजूने नाले असल्याने त्यांना बाहेर काढताना मोठी पंचाईत झाली होती. त्यांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम पाठविण्याची मागणी आ.वीरेंद्र जगताप यांनी सकाळी १०.३० वाजता विधानसभेत केली. यानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. मात्र, त्यापूर्वीच गावकºयानी शिक्षकांना बाहेर काढले. राजुरा येथे आठवडी बाजारापर्यंत गावात पाणी शिरले. मदतीसाठी उपविभागीय अधिकारी स्नेहल कनिचे यांच्या निर्देशाने तहसीलदार बी.एन. राठोडसह तलाठी, पोलीस अधिकारी गावात पोहोचले.
धामणगाव तालुक्यात दीडशे घरे पाण्याखाली
पूरस्थिती बिकट : १८ हजार हेक्टर शेतात पाणीच पाणी
तालुक्यात सलग तीन दिवसांपासून संततधार पावसाने कहर केला आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असून, पुलाची उंची कमी असल्याने चार गावांचा संपर्क तुटला, तर दोन गावांतील दीडशे घरात बुधवारी पहाटे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामुले धान्य व जीवनाश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील पंधरा दिवसापूर्वी पेरलेली तब्बल १८ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.
धामणगाव रेल्वे तालुक्यात तिसऱ्याही दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे. मंगळवारी रात्री दक्षिण भागात सर्वाधिक पाऊस झाल्याने चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे तहसीलदार अभिजित नाईक यांनी त्या भागांचा दौरा करून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाल्याचे पाणी इतर ठिकाणी जागा नसल्याने मलातपूर व नारगावंडी या दोन्ही गावात शिरले. मलातपूर गावातील ७० घरांतील अन्नधान्य पूर्णत: ओले झाले. पहाटे पाणी शिरल्याने जीवनाश्यक वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही. हीच स्थिती नारगांवडी गावांची आहे.
चंद्रभागा नदी दुथडी वाहत असल्याने नाल्याचे पाणी गावात शिरले. येथीलही झोपडपट्टी भागातील सर्व घरांत पाणी शिरले. गावातच पूरस्थिती निर्माण झाली आहे. तहसीलदार नाईक यांनी दोन्ही गावात जाऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.
तिबार पेरणीचे संकट
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे १५ दिवसांपूर्वी पेरलेल्या १८ हजार हेक्टर शेतात पाणी साचले. पेरलेले सोयाबीन, कपाशीचे बियाणे दडपले, तर काही शेतातील पाणी बाहेर पडत नसल्याने अंकुर करपण्याची शक्यता आहे. अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. पेरणीचे तिबार संकट घोंगावत आहे.
लोकमत विधानभवनात
काल झालेल्या पावसाने आलेल्या पुरामुळे सोनेगाव खर्डा येथील ६३ विद्यार्थ्यांना शाळेतच रात्र काढावी लागली. ‘लोकमत’ने वस्तुस्थितीदर्शक वृत्त प्रकाशित केले. या बाबीची आ. वीरेंद्र जगताप यांनी दखल घेत विधानभवनात बुधवारी औचित्याचा मुद्दा मांडला. ज्या नाल्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली, त्या कोल्हा नाल्याची खोली वाढविली असती तर ही स्थिती उदभवली नसती. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा मुद्दाही आ. जगताप यांनी मांडून पुलाची उंची वाढवावी. पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणीही त्यांनी केली आहे.
नांदगावात शेतजमीन खरडली
नद्या-नाले झाले जिवंत : पिकांचे नुकसान
२४ तासांत झालेल्या संततधार पावसाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा या मुख्य नद्यांसह नाल्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी-नाल्याच्या दुतर्र्फा असलेल्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे खरिपाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना निसर्गाने जबर फटका दिला आहे. पुरामुळे यवतमाळ मार्ग सुमारे तीन तास बंद होता.
अमरावती-यवतमाळ मार्गातील बेंबळा नदी २४ वर्षांत पहिल्यांदाच रौद्र रूप धारण केले. नांदगाव तालुक्यात ९० मिमी पावसाची नोंद झाली, तर आजपर्यंत ४३४ मिमी पावसाची नोंद प्रशासनाने घेतली आहे. अमरावती-यवतमाळ मार्गावरील माहुली चोर येथे नांदगाव-सावनेर मार्गावरील मोखड येथे तसेच पापळ गावानजीकच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. सकाळी ११ वाजेपर्यंत झालेल्या या पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते.
कोदोरी येथील ३० जणांना धानोरा येथे पोहचवून जेवण व निवाºयाची व्यवस्था करण्यात आली. कंझरा, पहूर, जावरा, संग्रामपूर (शिवणी रसुलापूर) येथे गावानजीक पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नांदगावचे ठाणेदार मगन मेहते, महसूल अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
धामकला पुरामुळे बेटाचे स्वरूप
एका बाजूला बेंबळा, दुसऱ्या बाजूला मिलमिली आणि उर्वरित बाजूंनी असलेले नाले दुथडी भरून वाहत असल्याने धामक गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. ग्रामस्थांना गावाबाहेर पडण्याचा मार्ग पाण्याने रोखून धरल्याचे दृश्य येथे बुधवारी होते. सततच्या पावसामुळे आधीच शिवारात पाणी असताना बुधवारी सकाळी १० ते ११ दरम्यान कोसळलेल्या पावसाने ग्रामदैवत असलेले बहिरमबाबाच्या मंदिराला वेढा घालून पाण्याने गावाकडे कूच केली. नदीवर असलेल्या पुलावरून पाणी होते. शिवारात जेमतेम तासभरापूर्वी चारण्यास पाठविलेल्या गुरांचा लोंढा अतिवृष्टीमुळे एकाचवेळी गावात शिरला. या गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी सरपंच प्रवीण चौधरी यांनी केली.