अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड टकलूला गुजरातमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:10+5:302021-04-02T04:14:10+5:30

अमरावती : शारदा नगरातील बहुचर्चित चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी टकलू ऊर्फ इसरार मुख्तार शेख(रा. कोटला ...

Mastermind Taklu arrested in kidnapping case from Gujarat | अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड टकलूला गुजरातमधून अटक

अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड टकलूला गुजरातमधून अटक

Next

अमरावती : शारदा नगरातील बहुचर्चित चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी टकलू ऊर्फ इसरार मुख्तार शेख(रा. कोटला अहमदनगर) व त्याचा साथीदार अज्जू ऊर्फ अयाज उस्मान शेख ( रा. पुणे) याला गुजरात पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेश व बिहारच्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीतील आरोपींसह पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गुजरात राज्यातून अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणातील १० आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. राजापेठ पोलिसांचे पथक दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गुजरात राज्यात रवाना झाले आहे.

शारदा नगरातील मुलाच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली होती. त्यात चार महिला, तर चार पुरुषांचा समावेश होता. आता दोघांना अटक केल्यामुळे आरोपींची संख्या १० झाली आहे.

१७ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास शारदानगर येथून दुचाकीने आलेल्या आरोपींनी चार वर्षीय मुुलाचे अपहरण केले होते. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र, अहमदनगर गुन्हे शाखा व राजापेठ पोलिसांनी तातडीने तपास करून मुलाला सुखरुप अंबानगरीत आणून त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. अमरावती व अहमदनगर पोलिसांनी तपासाची दिशा फिरवित या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली. पीसीआर दरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदौर पोलिसांच्या हाती लागले. मात्र, मुलाची दादी सोबत हसीना शेखच्या मदतीने यातील मास्टर माईंट टकलूचा या गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. मात्र, पोलिसांची चुणूक लागताच टकलू व अज्जू हा मुंबईत पळून गेला होता. मात्र, पोलीस स्टेशन उमरगा जिल्हा वलसाड (गुजरात) येथे भादंविचे कलम ३६३, ३६६, ३४ अन्वये गुन्ह्यातील तपास करताना आंतरराज्य टोळीला पोलिसांनी अटक केली. यात अमरावतीच्या गुन्ह्यातील आरोपींना त्यांच्यासोबत ३१ मार्च रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. ही माहिती गुजरात पोलिसांनी अमरावती पोलिसांना दिली. त्यामुळे अमरावती पोलिसांची एक पथक गुजरातला रवाना झाले आहे.

बॉक्स

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

तपासादरम्यान महिला आरोपी जयश्री सचिन हिंगे (४२, रा. प्रेमदान हुडको अहमदनगर), इसार ऊर्फ टकलूची पत्नी रुखसार इकबाल शेख (२८,रा. कोठला अहमदनगर) यांनी कारागृहातून जामिनीकरिता अर्ज केला होता. मात्र, शासकीय अभियोक्ता सुनील देशमुख व पोलिसांनी जामिनला विरोध केला. त्यामुळे २२ मार्च २०२१ रोजी त्यांचा जामीन अर्ज अमरावती न्यायालयाने फेटाळल्याची माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.

बॉक्स

गुजरातमध्ये बिल्डरचेही केले अपहरण

उमरगा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या एका बिल्डरचे ३० कोटींच्या खंडणीकरिता सात ते आठ आरोपींनी आठ दिवसांपूर्वी अपहरण केले होते. या गुन्ह्यातील तपास करीत असताना पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीला अटक केली. त्यात अमरावती अपहरण प्रकरणात सहभाग असलेले दोन्ही आरोपी गुजरात पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली.

कोट

गुजरात येथे बिल्डरच्या अपहरण प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी अंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले. त्यात टकलू व अज्जूला अटक झाली. आरोपीला आणण्यासाठी पथक रवाना झाले आहे.

मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजापेठ

Web Title: Mastermind Taklu arrested in kidnapping case from Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.