जिल्ह्यात मोगल, इंग्रजकालीन वस्तुंची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:29 AM2020-12-14T04:29:10+5:302020-12-14T04:29:10+5:30
परतवाडा : मोगलांसह इंग्रजकालीन वस्तू जिल्हास्तरावर राजस्व विभागाकडून गोळा केल्या जात केली जात आहे. यात तहसील पातळीवर तहसील कार्यालयात ...
परतवाडा : मोगलांसह इंग्रजकालीन वस्तू जिल्हास्तरावर राजस्व विभागाकडून गोळा केल्या जात केली जात आहे. यात तहसील पातळीवर तहसील कार्यालयात आणि कोषागारात पडून असलेल्या त्या जुळ्या वस्तूंचा शोध, आढावा घेतला जात आहे.
प्रस्तावित महसूल वस्तुसंग्रहालयात या ऐतिहासिक वस्तू ठेवल्या जाणार आहेत. महसूल वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून जुन्या आणि नव्यांची सांगड घालून हा मौल्यवान ठेवा जनतेसह अभ्यासक, पर्यटकांकरिता खुला केला जाणार आहे. महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे महसूल वस्तुसंग्रहालय साकारले जात आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत तहसीलदारांना संदेश पाठविला आहे. महसूल वस्तुसंग्रहालय बनवायचे आहे. याकरिता आपल्या अधिनस्त तहसील कार्यालय व कोषागारात असलेल्या प्राचीन व इंग्रजकालीन वस्तूंचा शोध घेण्यात यावा. या वस्तूंची यादी करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावी, असे सुचविले आहे. वस्तूंचे संकलन तहसीलदारांनी आपल्याकडे ठेवावे. या वस्तू अमरावती येथे पाठविण्याकरिता आदेशित करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अचलपूर, मोर्शी आणि मेळघाट (चिखलदरा) तहसील या सर्वात जुन्या आहेत. इंग्रजांच्या काळातील त्या आहेत. या ठिकाणी इंग्रजांसह मोगल, निजाम, बहमनी राजवट तसेच नवाबांचा राबता राहिला आहे. यात त्या-त्या काळातील महसुली पद्धती, प्रशासकीय रचनेचे दस्तावेज आणि प्राचीन वस्तू या जुन्या तहसीलमध्ये, कोषागारात पडून आहेत. त्यांना या महसूल वस्तुसंग्रहालयामुळे उजाळा मिळणार आहे. कोषागारात आणि तहसील कार्यालयात पेटीत कुलूपबंद असलेल्या वस्तू पेटीबाहेर येणार आहेत.
अचलपूरच्या इतिहासाकडे बघितल्यास, १८०३ पासून इंग्रजांचा वावर अचलपूरसह मेळघाटात राहिला. १८०३ ते १८५३ दरम्यान वऱ्हाडात निजामाची कारकीर्द होती. १८५३ पासून इंग्रजी कारकीर्द सुरू झाली. १८५३ ते १९०३ पर्यंत इंग्रजी कारकीर्द राहिली. १३४७ ते १४८४ पर्यंत बहमनी घराणे राहिले. हैद्राबादची निजामशाहीही अचलपूरने बघितली. १८६७ मध्ये अचलपूर जिल्हा बनविला गेला. १९०४-०५ पर्यंत हा जिल्हा अस्तित्वात होता. इंग्रजांचे मुख्यालयच अचलपूर होते. १८८७ मध्ये इंग्रजांनी अचलपूरला कारागृह उभारले. १८६८ च्या दरम्यान अचलपूर एसडीओ कार्यालयाची इमारत अस्तित्वात आली. डेप्युटी कमिश्नर ऑफिस यात होते. त्यामुळे अचलपूर आणि मेळघाट (चिखलदरा) कडून या महसूल वस्तुसंग्रहालयाला मोठ्या अपेक्षा आहेत.
कोट
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महसूल वस्तुसंग्रहालय साकारण्याचे प्रस्तावित आहे. आज हा विचार प्राथमिक अवस्थेत आहेत. नुसती संकल्पना मांडली गेली आहे. वस्तुसंग्रहालय पूर्णत्वास गेल्यानंतर त्यावर अधिक बोलता येईल.
- डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.