मातीमोल भाव, भाजपद्वारे मोफत संत्री वाटपाने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:10+5:302020-12-15T04:30:10+5:30
(फोटो/ मोहोड/मेल) अमरावती : संत्री मातीमोल भावात विकली जात असल्याने उत्पादकांना कोट्यावधीचा फटका बसला आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने ...
(फोटो/ मोहोड/मेल)
अमरावती : संत्री मातीमोल भावात विकली जात असल्याने उत्पादकांना कोट्यावधीचा फटका बसला आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने माजी कृषिमंत्री व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी चौकात मोफत संत्री वाटप करून शासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकाऱ्यांनाही मोफत संत्री देत संत्राउत्पादकांना हेक्टरी एक लाखांचे अनुदान देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली.
अतिवृष्टी व गारपीट यामुळे संत्रापिकाचे यापूर्वी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याची भरपाई उत्पादकांना अद्यापही मिळालेली नाही. यंदा लॉकडाऊनमध्ये संत्र्याला ३० हजार रुपये टनापर्यंत भाव होते. ते आता पाच हजारांपर्यंत उतरले आहेत. संत्री झाडालाच आहेत. ती बाजारात पोहोचणे महत्त्वाचे आहे. मात्र, भाव नसल्यामुळे व्यापारी फिरकत नाही. त्यामुळे संत्राउत्पादक अडचणीत आले आहेत. या उत्पादकांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, शहराध्यक्ष किरण पातूरकर, महापालिका सदस्य प्रणय कुळकर्णी, अतुल गोडे, मिलिंद बांबल, लता देशमुख, संध्या टिकले, राजू मेटे, गजानन काळमेघ, इंद्रभूषण सोंडे, बलदेव वानखडे, प्रभुदास इवनाते, उमेश अकर्ते, शिशू मानकर, अशोक खवले, ज्योती मालवीय, नितीन राऊत आदी उपस्थित होते.