१ मे पासून रास्त भाव दुकानदार संपावर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:51+5:302021-04-30T04:16:51+5:30
वरूड : कोरोना महामारीमुळे शिधापत्रिकाधारकांऐवजी दुकानदाराचा अंगठा लावून धान्य वितरित करण्याच्या मागणीसह रास्त भाव दुकानदारांच्या विविध मागण्या ...
वरूड : कोरोना महामारीमुळे शिधापत्रिकाधारकांऐवजी दुकानदाराचा अंगठा लावून धान्य वितरित करण्याच्या मागणीसह रास्त भाव दुकानदारांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्या, याकरिता महाराष्ट्र राज्य रास्तभाव दुकानदार संघ संलग्नित तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेच्यावतीने तहसील किशोर गावंडे यांना निवेदन देऊन १ मे महाराष्ट्र दिनापासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
तूर्तास कोरोना संक्रमणाचा काळ सुरू असून, अनेक पॉझिटिव्ह रुग्ण दुकानात येत आहेत. यावर उपाययोजना करण्यात याव्या. यात रास्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा किंवा वर्ल्ड फूड प्रोग्राम अंतर्गत २७० रुपये प्रतिक्विंटल प्रस्तावित केल्याप्रमाणे कमिशन मार्जिन देण्यात यावी, राज्यातील सर्व राशन दुकानदारांना विमा संरक्षण तसेच राजस्थान सरकारसारखे कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या दुकानदारांना ५० लाख रुपयांचा विमा आणि कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करताना एक ते दीड किलो घट येते. ती घट ग्राह्य धरण्यात यावी, शासकीय गोडाऊनमधून धान्य देताना ते ५० किलो ५८० ग्राम देण्यात यावे, दुकानदारांना नगर परिषद, महापालिका, ग्रामपंचायत स्तरावरून दुकानभाडे, विजबिल आणि स्टेशनरी चार्जेस देण्यात यावे. तसेच कोरोना महामारीमुळे शिधापत्रिकाधारकांचा अंगठा ई-पॉस मशीनवर न घेता दुकानदारांचा अंगठा लावूनच धान्य देण्याची परवानगी द्यावी, यासाठी तहसीलदार किशोर गावंडे यांना निवेदन देण्यात आले. अन्यथा १ मे पासून रास्त भाव दुकानदार संपावर जाईल, असा इशारा दिला आहे. तालुकाध्यक्ष बाबाराव भोंड, रमेश जैन, नरेंद्र खंडेलवाल, शैलेंद्र खंडेलवाल, रामा खंडेलवाल, भूषण महात्मे हे रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.