आरटीई प्रवेश अर्जासाठी ३१ मेची डेडलाईन
By प्रदीप भाकरे | Published: May 18, 2024 05:33 PM2024-05-18T17:33:43+5:302024-05-18T17:34:17+5:30
नव्याने करा अर्ज : मनपा शिक्षणाधिकारी यांचे आवाहन
अमरावती : शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने पुन्हा सुरू केली असून यामध्ये शहरातील खाजगी शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात झाली आहे. सन २०२४/२५ या . शैक्षणिक सत्राकरिता ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ मे आहे.
अमरावती शहरातील पालकांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी केले आहे. दरवर्षी ही प्रक्रिया मार्च किंवा एप्रिल मध्ये सुरू होते. परंतु यावेळी काही नवीन तांत्रिक बदलामुळे प्रवेश प्रक्रिया थोडी उशिरा सुरू झाली होती. यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पालकांना फॉर्म भरतेवेळी समस्या निर्माण होत होत्या. तसेच बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा या प्रक्रियेतून वगळण्यात आल्याने पालकांमध्ये तसेच समाज माध्यमात नाराजी पसरली होती.
यावर्षीच्या आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून तसेच पालकांच्या विनंतीनुसार खाजगी शाळांचा समावेश करून ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे .ज्यांनी आधी ऑनलाईन अर्ज केले असतील त्यांना पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत.
- डॉ. प्रकाश मेश्राम, शिक्षणाधिकारी, मनपा