९ मे रोजी गुरू ग्रह पृथ्वीजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:47 PM2018-05-06T22:47:23+5:302018-05-06T22:47:35+5:30
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ९ मे रोजी पृथ्वीजवळ येणार असून, ही खगोलीय घटना टेलीस्कोपसह साध्या डोळ्यानेही पाहणे शक्य आहे. या खगोलीय घटनेची उत्सुकता अमरावतीकरांमध्ये पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ९ मे रोजी पृथ्वीजवळ येणार असून, ही खगोलीय घटना टेलीस्कोपसह साध्या डोळ्यानेही पाहणे शक्य आहे. या खगोलीय घटनेची उत्सुकता अमरावतीकरांमध्ये पाहायला मिळत आहे. हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांच्या माहितीनुसार, ९ मे रोजी गुरू ग्रह सूर्यासमोर येत आहे. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. या दिवशी गुरू व सूर्य आमने-सामने राहतील. या काळात गुरुचे पृथ्वीपासूनचे अंतर सरासरीपेक्षा कमी असते. यापूर्वी ७ एप्रिल २०१७ रोजी गुरु-सूर्य प्रतियुती झाली होती. पृथ्वीपासून गुरुचे सरासरी अंतर ९३ कोटी किमी. असून गुरुचा व्यास १,४२८०० किमी. आहे. या ग्रहाला सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरुला एकूण ६७ चंद्र आहेत. टेलीस्कोपमधून गुरुचे निरीक्षण केले असता, गुरुवरचा पट्टा व ४ चंद्र दिसू शकतात. पृथ्वीपेक्षा गुरू ग्रह हा ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे गुरुचे खास वैशिष्ट्य आहे. ९ मे रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्यामुळे तो सहज ओळखता येतो आणि साध्या डोळ्यांनीही पाहता येऊ शकतो.