मे महिना शून्य सावलीचा; ३ मे पासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 17:49 IST2020-04-30T17:49:05+5:302020-04-30T17:49:43+5:30

राज्यात मे महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी १२ ते साडेबाराच्या दरम्यान सूर्य डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. अर्थात यावेळी सरळ उभ्या वस्तूची सावलीत दिसणार नाही. हा शून्य सावली दिवस राहणार आहे.

May the month of zero shadow; Starting on May 3 | मे महिना शून्य सावलीचा; ३ मे पासून प्रारंभ

मे महिना शून्य सावलीचा; ३ मे पासून प्रारंभ

ठळक मुद्दे२५ मे रोजी अमरावतीतून होणार सावली गायब


लोकमत न्यूज नेटवर्क
धीरेंद्र चाकोलकर/
अमरावती : राज्यात मे महिन्याच्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी १२ ते साडेबाराच्या दरम्यान सूर्य डोक्यावर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वस्तूची सावली ९० अंशाच्या कोनात राहील. अर्थात यावेळी सरळ उभ्या वस्तूची सावलीत दिसणार नाही. हा शून्य सावली दिवस राहणार आहे.
महाराष्ट्रात ३ मे रोजी सावंतवाडी व बेळगाव, ४ मे रोजी मालवण, ५ मे रोजी देवगड, राधानगरी व मुधोळ, ६ मे रोजी कोल्हापूर व इचलकरंजी, ७ मे रोजी रत्नागिरी, सांगली व मिरज, ८ मे रोजी जयगड व कराड, ९ मे रोजी चिपळूण व अक्कलकोट, १० मे रोजी सातारा व पंढरपूर, ११ मे रोजी महाबळेश्वर, फलटण व तुळजापूर, १२ मे रोजी माणगाव, बारामती, बार्शी, उस्मानाबाद व औसा, १३ मे रोजी मुळशी पुणे, दौंड व लातूर, १४ मे रोजी अलिबाग, लोणावळा, तळेगाव दाभाडे, पिंपरी-चिंचवड, जामखेड व अंतर्गत, १५ मे रोजी मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरान, राजगुरुनगर, बीड व गंगाखेड, १६ मे रोजी बोरिवली, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर व परभणी, १७ मे रोजी नालासोपारा, विरार, आसनगाव व वसमत, १८ मे रोजी पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड व हिंगोली, १९ मे रोजी नाशिक, कोपरगाव, डहाणू, वैजापूर, औरंगाबाद, जालना व पुसद, २० मे रोजी तलासरी, मेहकर, वाशिम, वणी, चंद्रपूर व मुल, २१ मे रोजी मनमाड, कन्नड व चिखली, २२ मे रोजी मालेगाव, चाळीसगाव, बुलडाणा, यवतमाळ व आरमोरी, २३ मे रोजी खामगाव, अकोला व वर्धा, २४ मे रोजी धुळे, जामनेर शेगाव निंभोरा उमरेड २५मे रोजी साखरी, अमळनेर, जळगाव, भुसावळ व अमरावती, २६ मे रोजी चोपडा, परतवाडा व नागपूर, २७ मे रोजी नंदुरबार, शिरपूर व गोंदिया आणि २८ मे रोजी शहादा व पांढुर्णा येथे शून्य सावली नागरिकांना अनुभवता येणार आहे.

शून्य सावलीमागील कारण
पृथ्वीच्या २३.३० अंशाने कललेल्या अक्षामुळे दक्षिणायन व उत्तरायण आणि दिवस लहान-मोठे होत असतात. त्याच्या परिणामी ही शून्य सावली अनुभवता येते.

तर विषुववृत्तावरच असती शून्य सावली
कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन रेषांच्या मधल्या पट्ट्यात सूर्यकिरणे क्रमाक्रमाने लंबरूप पडत असतात. त्यामुळे या भागातच वषार्तून दोनदा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे व मकरवृताच्या दक्षिणेकडे सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच तिची सावली पडते. पृथ्वीचा अक्ष जर सरळ ९० अंशात असता, तर फक्त विषुवृत्तावर नेहमीसाठी शून्य सावली अनुभवता आली असती.

अंदमान निकोबार बेटापासून प्रारंभ
भारतात ६ एप्रिलला अंदमान-निकोबार बेटापासून शून्य सावलीला सुरुवात झाली आहे. भारतातून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांतून कर्कवृत्ताची रेषा गेली आहे. तेव्हा भारताच्या दक्षिण टोकाकडून सूर्य क्रमाक्रमाने सरकत जाऊन या रेषेपर्यंत २१ जूनला डोक्यावर आलेला असेल. त्यापुढील उत्तरेकडील प्रदेशात सूर्य कधीच डोक्यावर येणार नाही.

शून्य सावलीचा असा घ्या आनंद
नागरिकांनी नमूद दिवशी समांतर पृष्ठभागावर एखादा दंडगोल पेन्सिल अथवा तत्सम वस्तू किंवा एखादा डबा अगदी सरळ उभा ठेवून शून्य सावलीचा थरार अनुभवावा. लॉडाउनच्या काळात आलेली ही आनंददायी पर्वणी ठरेल, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे अमरावती खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: May the month of zero shadow; Starting on May 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.