कोराेनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी घेतली व्यापाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:15 AM2021-02-16T04:15:43+5:302021-02-16T04:15:43+5:30
अमरावती : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार होत असल्यामुळे कोविड १९ च्या उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्यासाठी महापौर ...
अमरावती : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार होत असल्यामुळे कोविड १९ च्या उपाययोजना आणि नियमांचे पालन करण्यासाठी महापौर चेतन गावंडे यांच्या पुढाकाराने सोमवारी व्यापाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यात त्रिसूत्रीचे पालन न केल्यास गंभीर परिणामाच्या सामोरे जावे लागेल, असे संकेत महापौरांनी दिले.
आयुक्त प्रशांत रोडे, उपआयुक्त रवि पवार, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, व्यापारी संघटनेतील महेश पिंजानी, जयंत कामदर, प्रशांत अग्रवाल, अर्जुन चंदवानी, मुकेश सराफ, अशोक राठी, संजय छांगाणी, सुदेश जैन, ओमप्रकाश चांडक, प्रकाश बोके, आत्माराम पुरस्वार, घनश्याम राठी, विनोद सामरा, गोविंद सोमानी, मनोज खंडेलवाल, योगेश रतानी, बादल कुळकर्णी, सुरेश जैन आदी उपस्थित होते.
---------------
- तर प्रतिष्ठाने सील करू
महापालिका परिक्षेत्रात कोरोनाबांधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्रिसूत्री (मास्क वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर) पाळली नाही तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येवू शकते. हा धोका वेळीच ओळखावा व सर्वांनी दक्षता त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले. शहरातील बाजारपेठेत नियमांचे पालन करीत नसल्यास अशा प्रतिष्ठांनावर दंडात्मक तसेच सील करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील लॉन, मंगल कार्यालय, सार्वजनिक, खासगी कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर आता प्रति व्यक्ती ५०० रुपये दंड आकारण्याचे निर्देश दिले.
(फोटो आहे आढावा )