परिवहन समितीवरुन महापौर ‘टार्गेट’
By admin | Published: January 20, 2015 10:28 PM2015-01-20T22:28:53+5:302015-01-20T22:28:53+5:30
महापौर चरणजितकौर नंदा यांनी परिवहन समितीत सदस्य नियुक्तीचा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेताच विरोधी पक्षासह सुनील काळे गटातील सदस्य आक्रमक झाले.
गटनेतेपदाचा वाद : विरोधी पक्ष आणि राष्ट्रवादी गटाचे सदस्य एकवटले
अमरावती : महापौर चरणजितकौर नंदा यांनी परिवहन समितीत सदस्य नियुक्तीचा विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेताच विरोधी पक्षासह सुनील काळे गटातील सदस्य आक्रमक झाले. महापौरांच्या या निर्णया विरोधात एल्गार पुकारत जोरदार विरोध केला. सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा शब्दप्रयोग करुन महापौरांना ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न देखील झाला. अखेर पक्षनेता बबलू शेखावत यांनी हस्तक्षेप करीत येत्या सर्वसाधारण सभेत परिवहन व स्थायी समितीत सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन देताच वादावर पडदा पडला.
महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, नगरसचिव मदन तांबकेर यांनी कामकाजात सहभाग नोंदविला. सभा सुरु होताच सदस्यांच्या गणपुर्ती अभावी १० मिनीट सभा स्थगित करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला. त्यानंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरु होताच मागील सभेचे कार्यवृत्तांत कायम करताना काही बाबींवर सदस्यांनी आक्षेप नोंदविला. संत ज्ञानेश्वर सभागृहातील अपहार प्र्रकरणी संबंधितावर कारवाईच्या मागणीसाठी अरुण जयस्वाल, प्रदीप बाजड, विजय नागपुरे, अमोल ठाकरे, कांचन ग्रेसपुंजे, अजय सामदेकर, विजय नागपुरे, दिनेश बूब आदींनी पुढाकार घेतला.