अचलपुरातील भूलभुलैया; श्रीदत्त मंदिर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:29+5:30
इमारतीतील खिडक्यामधून प्रत्येक मंदिरात भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते. चंद्राचा प्रकाशही मंदिरात पोहोचतो. इमारतीतील सर्व मंदिरात दर्शन घेत पुढे चालत आल्यास आपोआपच भक्तांची प्रदक्षिणा पूर्ण होते. दर्शन घेतेवेळी एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात पोहचल्यानंतर भक्तांचे पाय कुठल्याही मूर्तीच्या डोक्यावर येत नाहीत. मंदिरात प्रवेश घेताना आधी मुख्य मंदिर दत्ताचे. श्री दत्तप्रभूंच्या दर्शनानंतर खाली भुयारात पुरातन शिवलिंग आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपुरातील ‘भूलभुलैया’ श्रीदत्त मंदिर वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे. हे पुरातन मंदिर ७०० चौरस फूट क्षेत्रात विस्तारले आहे. या दोनमजली मंदिरात ११ मंदिरे असूून, अंतर्गत रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगदी खाली ज्ञानेश्वराचे मंदिर असून, अगदी कळसाला तुकारामाचे मंदिर आहे. येथे ‘ज्ञानेश्वरांनी रचिला पाया, तुका झालासे कळस’ याची प्रत्यक्ष अनुभूती बघायला मिळते.
जवळपास १६८ वर्षांपूर्वीचे हे श्रीदत्त मंदिर (भूलभुलैया) अचलपूर शहरातील सुलतानपुऱ्यात उभारले गेले आहे. दोन मजली या इमारतीत चढण्या-उतरण्याकरिता सागवानी लाकडाचा जीना आजही शाबूत आहे. या इमारतीतील खिडक्यामधून प्रत्येक मंदिरात भरपूर सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते. चंद्राचा प्रकाशही मंदिरात पोहोचतो. इमारतीतील सर्व मंदिरात दर्शन घेत पुढे चालत आल्यास आपोआपच भक्तांची प्रदक्षिणा पूर्ण होते. दर्शन घेतेवेळी एका मंदिरातून दुसऱ्या मंदिरात पोहचल्यानंतर भक्तांचे पाय कुठल्याही मूर्तीच्या डोक्यावर येत नाहीत. मंदिरात प्रवेश घेताना आधी मुख्य मंदिर दत्ताचे. श्री दत्तप्रभूंच्या दर्शनानंतर खाली भुयारात पुरातन शिवलिंग आहे. या शिवालयात उतरण्याकरिता असलेल्या १६ पायऱ्या वेगळेच महत्त्व ठेवून आहेत. तेथून पुढे ज्ञानेश्वर, विष्णू दरबार, गजलक्ष्मी (अन्नपूर्णा), रामदरबार, रिद्धी-सिद्धीसह गणपती व अन्य मंदिरे आहेत.
मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि भक्त हनुमानजीही विराजमान आहेत. हा संपूर्ण रामदरबार अचलपुरमधील भुलभुलैयाचे वैशिष्ट्य ठरला आहे. याच मंदिरात परिपूर्ण असा विष्णू दरबारही आहे. यात विष्णू, लक्ष्मी, त्यांचे द्वारपाल जय, विजय आणि वाहन गरुडही बघायला मिळतात. अशा या पुरातन मंदिरात प्रवेश घेतल्यानंतर आतल्या आतच तो भक्त फिरत राहतो. दरम्यान आता आपण भुललो. आता बाहेर कसे पडायचे, या विचाराने तो वाट शोधतो. त्याच्या एकदम रस्ता लक्षात येत नाही. म्हणून या श्री दत्त मंदिराला भुलभुलैया म्हटले गेले.
अस्पृश्यांकरिता खुले
१६० वर्षांपूर्वीच्या या मंदिरात तेव्हा अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. महात्मा गांधींच्या सूचनेवरून हे मंदिर अस्पृशांकरिता खुले केल्या गेले. १९२७-२८ च्या दरम्यान महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, जमनलाल बजाज आदी मंडळी अचलपूरच्या चौधरी मैदानावर आली होती. तेव्हा विमलानंद नानासाहेब देशमुखांनी या सर्वांना या श्रीदत्त मंदिरास भेट देण्याची विनंती केली. यावर गांधीजींनी मंदिर सर्व अस्पृश्यांकरिता ते खुले करण्याची सूचना केली. जयप्रकाश नारायण व जमनलाल बजाज त्यावेळेस सुलतानपुºयात पोहोचलेत आणि श्रीदत्त मंदिर (भुलभुलैया) सर्वांसाठी, अस्पृशांसाठी खुले करण्यात आल्याची दवंडी दिली गेली.
महिलांना अनुमती
आधी जुने गुरुचरित्र पारायणात केवळ पुरुषांचाच सहभाग राहायचा. गुरुमाऊली अन्नासाहेब मोरेदादांच्या दुरुस्ती वजा सूचनेनंतर अचलपुरच्या या श्रीदत्त मंदिरात महिलांनाही सामूहिक गुरुचरित्र वाचण्यास अनुमती दिल्या गेली.