'या' जिल्ह्यांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण कागदोपत्रीच? WHOच्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:34 PM2022-12-23T12:34:01+5:302022-12-23T12:40:09+5:30
बीड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, बृहन्मुंबईत थर्ड पार्टी सर्व्हे
परतवाडा (अमरावती) : राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची पहिली फेरी १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. यात घरोघरी सर्वेक्षण करून लसीकरणापासून वंचित बालकांची यादी तयार करून त्यांचे मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्याबाबत आरोग्य विभागाला कळविण्यात आले होते. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने बीड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, बृहन्मुंबई जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात ८१ ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात लसीकरण मोठ्या प्रमाणात कागदोपत्री झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ८१ ठिकाणी सर्वेक्षणात ४९२ घरांना भेटी दिल्या आणि ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील ५६५ बालकांना तपासले. यातील १३६ बालके गोवर- रुबेला लसीकरणापासून वंचित असल्याचे आढळून आले. या १३६ वंचित बालकांमधून एकूण ५१ बालकांची नावे देय यादीमध्ये उपलब्ध नव्हती. याद्वारे आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षणाचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात ५९ घरांमध्ये तपासणी केल्यावर ७५ टक्के बालकांचे लसीकरण सोडलेले आढळून आले. महानगर पालिका क्षेत्रात ५८ घरामध्ये ४२ टक्के बालके सोडलेले आढळून आले आहे.
बीड, वाशिम, मुंबई मनपा क्षेत्र असमाधानकारक
जागतिक आरोग्य संघटनेने बीड, वाशिम आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण अतिशय असमाधानकारक झाले असल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. त्यामुळे तात्काळ काम व्यवस्थित करण्याचे पत्र कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिका आरोग्य विभागाला पाठविले आहे.
या होत्या सूचना
१) आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे व वंचित लाभार्थींची यादी अद्ययावत करावी.
२) मोहिमेअंतर्गत कुणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
3) सर्वेक्षण पूर्ण केले असल्याचे पर्यवेक्षक तसेच लसीकरण क्षेत्र संनियंत्रक यांच्यामार्फत संनियंत्रण करून खात्री करण्यात यावी.