शेतीची यांत्रिक मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर; अवजारांची बँक आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 02:28 PM2021-02-17T14:28:51+5:302021-02-17T14:29:16+5:30
Amravati News शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतीची ट्रॅक्टरने मशागत शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्याचवेळी ट्रॅक्टरमालकही कधी नव्हे तो मशागतीच्या संपूर्ण पैशांच्या ऐडव्हान्ससाठी अडून बसल्याचे चित्र अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.
गतवषार्पेक्षा यावर्षी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व तूरदेखील वेळेच्या अगोदर निघाल्याने शेते पूर्णत: रिकामी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या मागे लागला असला तरी डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करणे आवाक्?याबाहेर झाले असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.
एकीकडे डिझेलसह सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. यामुळे उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत आहे. यामुळे शेती करावी तरी कशी, असा पेच शेतकऱ्यांपुढे आहे.
बैलजोड्यांची संख्या घटली
अलीकडे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली आणि सोबतच बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने करू लागला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक गावात दहा ट्रॅक्टरच्या वर अधिक संख्या झाली आहे. प्रत्येक शेतकरी नांगरणी, वखरणीच नव्हे, पेरणी व पिकांना फवारणीसुद्धा ट्रॅक्टरच्या साह्याने करीत आहेत.
रासायनिक खताचा वापर होत असल्याने शेतजमिनीचा पोत बिघडला आहे. परिणामी जमिनीचा कडकपणा वाढला. त्यामुळे बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरने नांगरणी वखरणी केली, तर फायद्याचे ठरते. यंदा त्याचा दरही वाढला आहे.
- राजू झलके, जळगाव आर्वी
डिझेलचा दर गतवर्षी प्रतिलिटर ६७ रुपयांच्या आसपास होता. तो आता ८६ रुपयांवर गेला आहे. त्यामुळे प्रतिएकराचा मोबदला आता प्रतिलिटरवर गेला आहे. शेतकऱ्यांनी ८० टक्के मोबदला दिला, तर काही तरी शिल्लक पडेल.
- महेंद्र इंगळे, कावली वसाड
एकल शेती करण्याऐवजी अवजारांची बँक गावोगावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केल्यास शेतीच्या खचार्चा भार वहन करणे सोपे जाईल. हा विचार बोलून दाखवण्याऐवजी लवकरात लवकर कृतीत आणावा लागेल.
- सूरज शिसोदे, नायगाव