अमरावतीत मेडिकल काॅलेज होणारच, महाविकास आघाडीची पत्रपरिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 09:45 PM2021-01-09T21:45:21+5:302021-01-09T21:46:03+5:30

Amravati News : अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच ही काळ्या दगडावरील रेघ आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Medical College to be set up in Amravati | अमरावतीत मेडिकल काॅलेज होणारच, महाविकास आघाडीची पत्रपरिषद

अमरावतीत मेडिकल काॅलेज होणारच, महाविकास आघाडीची पत्रपरिषद

Next

अमरावती - अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय होणारच ही काळ्या दगडावरील रेघ आहे, अशी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सत्ता असताना वैद्यकीय महाविद्यालय आणणे तर दूर; परंतु त्यासंबंधीचा निर्णयही न घेऊ शकलेली भाजपक्षाची काही स्थानिक मंडळी अमरावतीकरांमध्ये सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमची सत्ता नसताना या मुद्यावर आम्ही कधी बोललो नाही. परंतु, भाजपची मंडळी विनाकारण सतत संभ्रम निर्माण करीत असतील, तर महाविकास आघडीनेही वास्तववादी भूमिका मांडायला हवी, हा या पत्रपरिषदेच्या आयोजनामागचा हेतू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पत्रपरिषदेला महाआघाडीच्या नेत्यांची जंबो उपस्थिती होती. एकवाक्यताही होती. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, अनंत गुढे, विलास इंगोले, सुनील वऱ्हाडे, राजेंद्र महल्ले, बबलू शेखावत, किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, प्रवीण हरमकर, सुनील खराटे, राजेश वानखेडे, प्रशांत डवरे, नीलेश शर्मा, प्रमोद महल्ले उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर चारच महिन्यांत अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता मिळाली. प्रवेशासाठीची प्रक्रिया २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती खोडके यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या अनुषंगाने डाॅ. पद्माकर सोमवंशी, डाॅ. अनिल रोहणकर आणि वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा अनुभव असलेले जळगावचे एक डाॅक्टर अशी संयुक्त बैठक तीन वेळा आम्ही घेतली. आवश्यक ती जागाही उपलब्ध आहे. वर्ष-दोन वर्षाच्या कालावधीत मेडिकल काॅलेज कार्यान्वित होईल, अशी माहिती, खोडके यांनी दिली.

फडणवीसांच्या जवळचे, तरीही काॅलेज नाही

भाजपचे अनिल बोंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. प्रवीण पोटे नामदार आणि सुनिल देशमुख हेदेखील आमदार होतेच. वैद्यकीय महाविद्यालय आणण्याची इच्छाशक्ती असती, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना महाविद्यालय मंजूर करवून घेता आले असते, अशी आठवण संजय खोडके आणि अनंत गुढे यांनी करवून दिली. यापूर्वीच्या सरकारात वैद्यकीय महाविद्यालयाच्या बैठकीला प्रवीण पोटे, अनिल बोंडे, सुनील देशमुख यांनी पाठ फिरविली होती. पोटे हे त्यावेळी पालकमंत्री होते, अशी माहिती गुढे यांनी दिली.
संतुलन बिघडू देऊ नये, सुनील देशमुखांवर निशाणा
आम्ही तीनवेळा हरलो. सुलभा खोडके दोन वेळा आणि मी एक वेळा. परंतु, आम्ही संतुलन बिघडू दिले नाही. हरल्यावर संतुलन कायम राखता यायला हवे, असे वक्तव्य संजय खोडके यांनी केले. अलीकडेच सुनिल देशमुख यांनी ‘अपना भिडू..’ या आशयाचे चिमटा काढणारे वक्तव्य केले होते. तो धागा पकडून खोडके यांनी सुनील देशमुख यांच्यावर निशाणा साधला. पत्रकारांनी हजार प्रश्न उपस्थित केल्यावर या मुद्यावर स्वतंत्र पत्रपरिषद घेऊ, असे खोडके यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Medical College to be set up in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.