अमरावतीत हत्येचा थरार! मुलगा, सुनेसमोर मेडिकल स्टोअर संचालकाचा गळा चिरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 11:43 AM2022-06-23T11:43:27+5:302022-06-23T12:10:53+5:30
घटनेनंतर तिन्ही हल्लेखोर पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अमरावती : हाकेच्या अंतरावर असलेल्या मुलगा व सुनेसमक्ष एका मेडिकल व्यावसायिकाचा निर्घृणपणे गळा चिरण्यात आला. या घटनेत जागीच कोसळलेल्या त्या व्यावसायिकाचा अवघ्या काही मिनिटात नजीकच्या रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून तीन अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
उमेश प्रल्हादराव कोल्हे (५४, रा. घनश्यामनगर, सातुर्णा, अमरावती) असे मृताचे नाव आहे. उमेश कोल्हे यांचे अमरावती तहसील कार्यालयासमोरील रचनाश्री मॉलमध्ये अमित व्हेटरनरी मेडिकल आहे. २१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास नूतन कन्या शाळेच्या गल्लीत ही घटना घडली. घटनेनंतर तिन्ही हल्लेखोर पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तक्रारीनुसार, २२ जून रोजी रात्री १०.२५ च्या सुमारास कोल्हे हे मेडिकल बंद करून घरी जाण्यासाठी निघाले. एका मोपेडवर उमेश कोल्हे हे पुढे तर दुसऱ्या दुचाकीने मुलगा संकेत व स्नुषा वैष्णवी हे दुसऱ्या दुुचाकीवर होते. ते मेडिकलपासून प्रभात चौकाकडून श्याम चौकात जाणाऱ्या गल्लीत पोहोचले. त्यावेळी घंटीघड्याळापासून एका दुचाकीवर तीन हल्लेखोर आले. यावेळी एक जण दुचाकीवरच होता तर दोघे खाली उतरले. त्यापैकी एकाने चाकूने कोल्हे यांच्या गळ्यावर एकच वार केला. त्यामुळे कोल्हे खाली कोसळले. याचवेळी मागून मुलगा संकेत आला. संकेत व त्यांची पत्नी अवघ्या १५ फूट अंतरावर असताना हल्लेखोरांनी उमेश यांच्यावर हल्ला चढवला. त्यावेळी संकेत यांनी धाव घेऊन वडील उमेश यांना तत्काळ बाजूलाच असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सर्व दिशेने तपास, पाच पथके
घटनेवेळी संकेत कोल्हे यांच्या खिशात ३५ हजार रुपये रोकड होती. मात्र, हल्लेखोरांनी उमेश यांच्या गळ्यावर चाकू खुपसला. त्या एकाच घावाने उमेश यांची नस कापली गेल्याने ते कोसळले. मात्र, आरोपींनी त्यांच्या खिशांना हात लावला नाही, चाकूने भोसकल्यानंतर तिघेही हल्लेखोर एसबीआयच्या दिशेने पसार झाले. त्यामुळे लुटमार करणे, हा मारेकऱ्यांचा उद्देश नसावा. मात्र, आम्ही सर्व अँगल तपासत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी सांगितले. कोल्हे यांचे कुणाशी जुने वैमनस्य होते का तथा काही ‘बिझनेस रायव्हलरी’ नसावी ना, या दिशेने देखील तपास करण्यात येत आहे. सध्यातरी त्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी कोल्हे यांचा जीव का घेतला, हे अनुत्तरित आहे.
या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या अनुषंगाने उमेश कोल्हे यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी यांच्या नेतृत्वात उपायुक्त विक्रम साळी यांच्याकडे करण्यात आली.
एकाच दुचाकीहून आलेल्या तिघांपैकी एकाने उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वार केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पाच पोलीस पथके गठित करण्यात आली आहेत.
- भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त