वैद्यकीय चमू जीव धोक्यात घालून करताहेत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:10+5:302021-04-23T04:13:10+5:30
धारणी : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे १६ बेडची निर्मिती ...
धारणी : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे १६ बेडची निर्मिती करण्यात आली असून, ते सर्व बेड फुल्ल असल्यामुळे कोरोना मेळघाटात किती भयंकर पसरला याची प्रचिती आली आहे.
मेळघाटात गावोगावी कोरोनाने हातपाय पसरविले आहे. गावखेड्यात लोकांनी तपासणी करण्यास नकार देत भुमका परिहारकडे स्वतःला बांधून घेतले आहे. दुसरीकडे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता अनुकूलता दर्शविली आहे. धारणी येथील उपजिल्हा रुग्णालय हे तीन मजल्याचे असून, तळमजल्यावर चार रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. आज त्यात वाढ करून पहिला माळा संपूर्ण कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यात १२ बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वच्या सर्व १२ बेडवर बाधित रुग्ण औषधोपचार घेत आहेत. रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता वैद्यकीय अधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. यात वैद्यकीय अधीक्षिका रेखा गजरलवार यांच्यासह डॉ. जावरकर, डॉ. जामकर, डॉ. हसीना शेख, डॉ. प्रवीण मुरले, डॉ. पवार यांच्यासह सर्व महिला व पुरुष परिचारिका, राहुल तिवारी, पॅथॉलॉजिस्ट मंडळी आपला जीव धोक्यात घालून त्यांची वैद्यकीय सेवा करीत आहेत.