मेळघाटातील ‘मेडिकेअर’ कोलमडली; मोटरबाइक अॅम्ब्युलन्स बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 05:27 PM2019-05-16T17:27:45+5:302019-05-16T17:28:11+5:30
जिल्हा शल्यचिकित्सकांचा लक्षवेध
परतवाडा (अमरावती) : मेळघाटातील गरजू आदिवासींना तातडीची वैद्यकीय सेवा पुरविणाºया मोटरबाइक अॅम्ब्यूलन्स कित्येक दिवसांपासून बंद पडल्या आहेत. मेळघाटातीलआरोग्य व्यवस्थेत एक वर्षापूर्वी दाखल या अॅम्ब्यूलन्स हतरू, हरिसाल, काटकुंभ, बैरागड व टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात धूळखात उभ्या आहेत. येथे या अॅम्बुलन्स आहेत. यातील हतरू, काटकुंभ येथील अॅम्ब्यूलन्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
‘शिव आरोग्य, महाराष्ट्र शासन’ असे नमूद नव्या कोºया या बाइक औषधी व ऑक्सिजन सिलिंडरसह तैनात आहेत. बी.एस्सी. नर्सिंगचा अभ्यासक्रम आणि लाइफ सपोर्टिंग प्रशिक्षित तज्ज्ञ मोटरबाइकरकडून या अॅम्ब्यूलन्स नियंत्रित केल्या जातात. जेथे रस्ते अरुंद आहेत, चार चाकी अॅम्ब्यूलन्स पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी या मोटरबाइक अॅम्ब्यूलन्स उपयोगी आहेत. आदिवासींकरिता त्या जीवनदायी ठरल्या होत्या. मात्र, नव्याने नऊ दिवस याप्रमाणे ती यंत्रणा अल्पवेळ धडाक्यात चालली व प्रथेप्रमाणे बंद पडली.
दरम्यान, या अॅम्ब्यूलन्सवर तैनात तज्ज्ञ कर्मचाºयांना ३० हजारांवरून १६ हजार रुपयेच वेतन देण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे. याचाही फटका मोटरबाइक अॅम्ब्यूलन्सला बसला आहे. यामुळे काहींनी नोकरी सोडली, काही नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. मेळघाटातील या मोटरबाइक अॅम्ब्यूलन्सचे नियंत्रण अथवा त्याविषयीची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांकडे नाही, तर बंद पडलेल्या, धूळखात उभ्या मोटरबाइक अॅम्ब्यूलन्समुळे मेळघाटातील आरोग्य व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे.
१ ऑगस्ट २०१७ रोजी कार्यान्वित
बाइक अॅम्ब्यूलन्स सेवेचा शुभारंभ १ ऑगस्ट २०१७ रोजी झाला. ही मोफत सेवा १०८ या क्रमांकावर उपलब्ध आहे. पहिल्याच दिवसापासून विविध स्तरांतून या सेवेला प्रतिसाद मिळाला. अरुंद रस्ते, अतिदुर्गम परिसर या ठिकाणाहून बाइक अॅम्ब्यूलन्सला मोठ्या प्रमाणात कॉल होते. मात्र, त्या अॅम्ब्यूलन्स आता मेळघाटच्या रस्त्यावरून बेपत्ता झाल्याने ही यंत्रणा कोलमडली आहे.
बाइक कशासाठी?
अरुंद रस्ते व डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणे अशक्य आहे, त्या ठिकाणी या बाइक अॅम्ब्यूलन्सने सहजरीत्या पोहचणे शक्य आहे. याचा विचार करून राज्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, नंदूरबार, मेळघाट अशा दुर्गम भागांत बाइक अॅम्ब्यूलन्सच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आली होती.